आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरी समजले जाणारे एकनाथ खडसे व गिरीश महाजन या दोघांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे.
20 संचालकांची निवडणूक
विशेष म्हणजे उद्याच या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार?, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आज सकाळी 8 वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली आहे. महाविकास आघाडीचे सहकार पॅनल व भाजप-शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनलमध्ये जिल्हा दूध संघाचे 20 संचालक निवडून देण्यासाठी थेट लढत होत आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, दूध संघाच्या माजी अध्यक्षा व एकनात खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतदार ठरवणार आहेत.
सर्वाधिक लक्षवेधी निवडणूक
सर्वाधिक लक्षवेधी मंदा खडसे विरुध्द आमदार मंगेश चव्हाण ही लढत आहे. मुक्ताईनगरातून महाविकास आघाडीच्या पॅनलकडून एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या उमेदवार आमदार मंगेश चव्हाण यांनी दंड थोपटले आहेत.
खडसेंविरोधात मंत्री, आमदार एकवटले
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकनाथ खडसेंचा पराभव करण्यासाठी दोन मंत्री, पाच आमदार एकवटले असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी प्रचारादरम्यान केला आहे. खडसेंचा पराभव करुन ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिंदे गटाने कंबर कसली असून मंत्री अन् आमदार जळगावात शडडू ठोकून आहेत. भाजप शिंदे गटाकडून खडसेंचा पराभव करण्यासाठी जोरदार ताकद लावण्यात येत आहे
सुनेचा सासूविरोधात प्रचार
दूध संघाच्या निवडणुकीत सर्वाधिक चुरशीची लढत मुक्ताईनगर मतदार संघात होत आहे. यात खडसेंच्या सून रक्षा खडसे या भाजपच्या असल्याने साहजिकच त्यांना आ. मंगेश चव्हाण यांच्या बाजूने प्रचार करावा लागत आहे. खासदार रक्षा खडसे यांनी त्यांच्या सासू मंदाताई खडसे यांच्या विरोधात प्रचार मेळाव्यात सहभाग घेऊन आपल्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले आहे, त्यांचे हे आवाहन महा विकास आघाडीच्या उमेदवार सासू मंदाताई खडसे यांच्या विरोधात असल्याने सासू सुनेची ही लढत संपूर्ण राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनली आहे.
आमदार चिमणराव पाटील विरुद्ध माजी आमदार सतीश पाटील या लढतीकडेही सर्वांचे लक्ष लागून आहे. दोन्ही गटांनी विजयाचे दावे केलेले आहेत. या निवडणुकीसाठी रिंगरोडवरील संगम सोसायटीतील सत्य वल्लभ हॉलमध्ये मतदान होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.