आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:फिफा वर्ल्डकपच्या एसी स्टेडियमसाठी जळगावची फ्लाय अॅश

जळगाव / प्रदीप राजपूत15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कतारमध्ये रविवारपासून फुटबाॅल फिफा वर्ल्डकप सुरू हाेत आहे. मध्यपूर्वेतील देशांत प्रथमच ही स्पर्धा होत असून यजमान कतारने दाेहा शहराच्या ६० किमी अंतरामध्ये तब्बल आठ वातानुकूलित (एसी) स्टेडियम उभारले आहेत. बारा वर्षापासून हे बांधकाम होते. त्यामुळे जगभरात याची चर्चा होती. या कामासाठी जळगावातून ९ लाख टन फ्लाय अॅश आणि जीजीबीएस या बांधकाम साहित्याची निर्यात करण्यात आली आहे. केवळ या वर्ल्डकपमुळे बारा वर्षात भारताचा कतारशी असलेला निर्यातीचा व्यापार ३७५ दशलक्ष डाॅलरवरून १८३७ दशलक्ष डाॅलरवर पाेहचला आहे.

कतारमध्ये उन्हाळ्यात तापमान ५० अंश सेल्सियसपेक्षा जास्त असते. २०१० मध्ये या अतिश्रीमंत आणि अतिउष्ण देशाला फिफा फुटबाॅल वर्ल्डकपचे यजमानपद जाहीर झाले. त्यानंतर २०११ मध्येच कतारमध्ये आठ वातानुकुलीत(एसी) भव्यदिव्य बंदिस्त स्टेडियमचे बांधकाम सुरू झाले हाेते. संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या या स्टेडियमसाठी जळगावातून बारा वर्षापासून फ्लाय अॅश आणि हायक्लास काॅक्रिटसाठी लागणारे जीजीबीएस (ग्राऊंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लग) या बांधकाम साहित्याची निर्यात सुरू आहे. स्टेडियम आणि उंच इमारतींच्या मजबुतीसाठी जगभरात फ्लाय अॅशचा माेठ्या प्रमाणावर वापर केला जाताे. जळगावातून दरवर्षी ६० हजार टन याप्रमाणे बारा वर्षात ७ लाख टन फ्लाय अॅशची निर्यात झाली आहे. तर २ लाख टन जीजीबीएस असे एकुण ९ लाख टन साहित्य निर्यात करण्यात आले असून ही निर्यात सुरूच आहे. त्यातून १०० काेटींचा व्यापार जळगावातून हाेत आहे.

जळगावातून अॅश निर्यात : भुसावळ आैष्णिक विद्युत केंद्रात मासिक १२ हजार मेट्रिक टन फ्लॅाय अॅश उपलब्ध हाेते. त्यापैकी ४० टक्के फ्लाॅय अॅशची कतार, साैदी अरेबियात निर्यात हाेत असून उर्वरित स्थानिक सिमेंट उद्याेग, मुंबईतील इमारत बांधकामांसाठी पुरवली जाते. जळगावातून दर महिन्याला ५ हजार टन अॅश निर्यात केली जाते. अॅश आणि जीजीबीएसच्या निर्यातीची वार्षिक उलाढाल १०० काेटींची आहे. सन २०१० मध्ये भारतातून कतारमध्ये हाेणारी निर्यात ३७५.३९ दशलक्ष डाॅलर एेवढी हाेती. फिफा वल्डकपचे यजमानपद मिळाल्यानंतर पहिल्याच वर्षी भारतातून हाेणारी निर्यात दुप्पट झाली. २०१७ मध्ये ७८४.५६ दशलक्ष डाॅलर तर गेल्या २०२१-२२ या वर्षात ही निर्यात ७९ टक्के वाढून १८३७.७५ दशलक्ष डाॅलरवर पाेहचली.

या स्टेडियमची निर्मिती कतारची लाेकसंख्या २८ लाख असून त्यापैकी ९५ टक्के लाेक दाेहा या एकाच शहरात राहतात. त्यामुळे या शहरात ६० किलाेमीटरमध्ये अल बायत, अल जानुब, अल रयान, अल थुमामा, एज्युकेशन सिटी, खलिफा, लुसैल आयकाॅनिक आणि रस अबु अबुद या एकत्रितपणे ३.८० लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या स्टेडिअयची निर्मिती करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...