आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावधान!:'स्टेट बँक क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय' म्हणत भामट्याने केली 1 लाखाची फसवणूक

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावातील एका व्यक्तीची एक लाख रुपयात ऑनलाइन फसवणूक झाली आहे. अनोळखी मोबाईल नंबरवरुन फोन करून भामट्याने ‘स्टेट बँक क्रेडीट कार्ड विभागातून बोलतोय’, अशी थाप मारून एक लाख रुपये परस्पर वर्ग केले. या प्रकरणी शनिवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, नितीन भीमराव मोरे (वय 42, रा. पिंपळगाव हरेश्वर) यांची फसवणूक केली आहे. 28 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजता मोरे यांना 8926217402 या अनोळखी नंबरवरून एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. त्या भामट्याने स्टेट बँक क्रेडीट कार्ड विभाग (मुंबई) येथून बोलत असून तुमचे क्रेडीट कार्ड बँकेकडून ब्लॉक करण्यात आले आहे. पुन्हा सुरू करण्यासाठी मी सांगतो तशी प्रक्रिया करा, असे मोरे यांना सांगितले. त्यानुसार मोरे यांनी कृती सुरू केली.

फिर्याद दाखल

काही वेळाने मोरे यांच्या मोबाईलवर एक ओटीपी आला. भामट्याने बोलण्यात गुंतवून ठेवलेल्या मोरे यांच्याकडून ओटीपी विचारून घेतला. त्यानंतर काही वेळाचत मोरे यांच्या क्रेडीट कार्डमधून एक लाख रुपये परस्पर वर्ग झाले. पैसे विड्रावल झाल्याचा मॅसेज त्यांना उशिराने मिळाला. यांनतर मोरे यांनी पुन्हा भामट्याच्या नंबरवर फोन करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतर त्याने प्रतिसादच दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे मोरे यांच्या लक्षात आले होते. मोरे यांनी शनिवारी पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली. त्यानुसार 8926217402 या मोबाईल क्रमांक धारकाच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडुरंग गोरबंजार तपास करीत आहेत.

खात्याची माहिती देऊ नका

कोणत्याही अनोळखी व्यक्ती, अनोळखी मोबाईलवरुन आलेल्या कॉलवर बँक, क्रेडीट कार्ड संदर्भातील माहिती देऊ नये. कोणत्याही प्रकारची अडचण असल्याचे थेट वैयक्तीकपणे बँकेत जाऊन चौकशी करावी. बँक अधिकारी, कर्मचारी सांगतील तीच प्रक्रिया करावी. असे केल्यास ऑनलाईन फसवणूक टाळता येईल. अशी माहिती सायबर पोलिस ठाण्याचे निरीक्षक लिलाधर कानडे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...