आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात सन 2022 च्या तुलनेत शेती, घरे व प्लॉट खरेदी विक्रीसह इतर दस्त नोंदणीत 13.63 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे जिल्हा मुद्रांक व नोंदणी विभागाने दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 136.27 टक्के महसूल वसूलीचा उच्चांक केला आहे.
महसूल वसूलीचे उद्दिष्ट
सन 2022-23 या आर्थिक वर्षात जिल्हा मुद्रांक व नोंदणी कार्यालयाला शासनाकडून 240 कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. 31 मार्च अखेर जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये खरेदी विक्री व्यवहारांचे 97 हजार 78 दस्त नोंदवण्यात आले. त्यात सन 2021-22या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 13.63 टक्क्यांनी वाढ झाली. या वाढीमुळे गेल्या आर्थिक वर्षात मुद्रांक व नोंदणी विभागाला जिल्ह्यातून 327 कोटी 6 लाखांवर महसूल मिळाला. दिलेल्या उद्दिष्टाच्या तब्बल 136.27 टक्के महसूल वसुली झाली.
67 कोटींनी वाढवले होते उद्दिष्ट...
सन 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्ह्याला दस्त नोंदणीतून वसुलीचे 172 कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले. कोरोना संसर्गाची स्थिती असल्याने 42 कोटींनी हे उद्दिष्ट कमी करण्यात आले होते. राज्य शासनाकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खरेदीदारांना मालमत्तांच्या व्यवहारांसाठी प्रोत्साहन देऊन रिअल इस्टेटलाही चालना देण्यासाठी 1 सप्टेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक शुल्कात 3 टक्के तर 1 जानेवारी ते 31 मार्चपर्यंत 2 टक्के सवलत देण्यात आली.
त्यानंतरही मुद्रांक शुल्क भरणाऱ्यांना दस्त नोंदणीसाठी पुढील चार महिन्यांची मुभा देण्यात आली होती. सवलतीमुळे सन 2021 मध्ये मुद्रांक शुल्क वसुलीत वाढ नोंदवण्यात आली. या आर्थिक वर्षात खरेदी विक्री व्यवहाराची 83 हजार 844 दस्त नोंदणी होवून 195 कोटींचा मुद्रांक शुल्क वसूल झाला होता.
उद्दिष्टाच्या तुलनेत मुद्रांक शुल्क वसुलीमध्ये 102.58 टक्के वाढ नोंदवण्यात आली होती. सन 2022-23 मध्ये शासनाने जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट 68 कोटींनी वाढवले होते. त्यानंतरही वसुलीत 136 टक्क्यांवर वाढ झाली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.