आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आशादीप प्रकरण:वसतिगृहाची भडक बातमी देणारे वृत्तपत्र खाेटे, ‘दिव्य मराठी’च्या विश्वासार्हतेवर शिक्कामाेर्तब

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘तो’ संदर्भ २० फेब्रुवारीच्या कार्यक्रमाचा; व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर दाखल हाेणार गुन्हा

शहरातील गणेश काॅलनीतील आशादीप शासकीय महिला वसतिगृहातील त्या कथीत गैरप्रकाराबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय चाैकशी समिती नेमली हाेती. समितीने बुधवारी सलग अठरा तास प्रकरणाशी निगडीत ४१ जणांची चौकशी केली. मध्यरात्रीच ३.३० वाजता १६ पानी अहवाल राज्याच्या गृह विभागाला सादर केला. त्या अनुषंगाने गृहमंत्री अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्यासह महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी वसतिगृहात तसे प्रकरण घडलेच नसल्याची माहिती दिली.

बुधवारी जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष लतीफ पिंजारी, मंगला सोनवणे, फरीद खान, कादरिया फाउंडेशनचे फारुख कादरी, आबीद शेख,वर्षा लोहार हे वसतिगृहातील एका पीडितेस भेटण्यासाठी गेलेले होते. त्यांनंतर पीडितेचा गंभीर आरोप करणारा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. या तक्रारीच्या अनुषंगाने गृहमंत्री देशमुख यांनी चौकशी समिती नेमण्याचे आदेश दिले होते. सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कांचन पाटील, प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ डॉ. कांचन चव्हाण, पुनर्वसन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, पोलिस उपनिरीक्षक कांचन काळे, यशोदा कणसे यांची सहा सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. बुधवारी सकाळी १०.३० वाजेपासून चौकशी समितीचे अध्यक्ष धोडमिसे यांच्यासह समिती सदस्यांनी आशादीपमध्ये चौकशीला सुरुवात केली. मध्यरात्री ३ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. आशादीपमधील १७ पैकी १३ महिला, युवती, वसतीगृह परिसरातील ७ रहिवासी, ८ निवेदनकर्ते व आशादीप वसतिगृहातील कर्मचारी मिळून एकूण ४१ जणांची चौकशी करण्यात आली. इनकॅमेरा जबाब नोंदवण्यात आले.

पीडितेच्या व्हिडिओचा संदर्भ २० फेब्रुवारी रोजीच्या वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमाचा होता. त्या कार्यक्रमात त्या मुलीने कपडे बदलले होते. महिला वसतीगृह असल्याने पुरुष आत जावू शकत नाही. त्यावेळी तेथे कुणी पुरुष उपस्थित नसल्याचे चौकशीत आढळून आले. तेथील महिलांनीही असा प्रकार घडला नसल्याचे समितीला सांगितले. तसेच तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या गैरप्रकाराच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ तक्रारदारांकडे आढळून आला नाही. त्यामुळे ही घटना घडलीच नसल्याचे तथ्य चौकशीत समोर आले. तक्रारीच्या अनुषंगाने समितीच्या प्रश्नांचीही उत्तरे तक्रारदारांना देता आली नाहीत. वसतिगृहात समितीने सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत चौकशी केली. त्यानंतर रात्री १० वाजता उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी वसतिगृह परिसरातील सात रहिवाशांचे इन कॅमेरा जबाब नोंदवले. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात तक्रारदार लतीफ पिंजारी, मंगला सोनवणंेसह इतरांची चौकशी करण्यात आली. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे व जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वाघमारे हे अल्पबचत भवनात आले होते. रात्री ३ वाजेपर्यंत चौकशी करण्यात आली. समितीने आपसात चर्चा करुन १६ पानांचा प्राथमिक अहवाल तयार केला. मध्यरात्री ३.३० वाजता अहवाल गृहमंत्रालयाला सादर करण्यात आला. गुरुवारी दुपारीही १२ वाजेच्या सुमारास तक्रारदार पिंजारी, सोनवणे यांना समितीने अल्पबचत भवन येथे बोलवले होते. चौकशीमध्ये समितीने नीलिमा मिश्रा व सामाजिक कार्यकर्त्या वासंती दिघे यांची मदत घेण्याबाबत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने समितीने दिघे यांच्याशी संपर्क साधला होता. समितीने त्यांना शुक्रवारी भेटण्यासाठी बोलवले आहे. दरम्यान, वसतिगृहातील त्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध वसतीगृह प्रशासनाकडून जळगाव येथील जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. त्या व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार अाहे.

तक्रार करणाऱ्या नऊ जणांच्या जबाबात तफावत
जळगाव | गणेश कॉलनीतील एका महिला वसतिगृहात गैरप्रकार होत असल्याची तक्रार करणाऱ्या जननायक फाउंडेशनच्या सदस्यांसह नऊ जणांचे जबाब चौकशीने समितीने नोंदवले. यावेळी सर्वजण वसतिगृहाजवळ सोबत असूनही त्यांच्या जबाबात तफावत आढळून आली. निवेदन न वाचताच केवळ एका जणाच्या सांगण्यावरुन स्वाक्षऱ्या केल्याचे काहींनी सांगीतले. या प्रकारामुळे निवेदन देणारी संघटना व सदस्यांत एकमत नसून त्यांचा उद्देश स्पष्ट नसल्याचे समोर आले आहे. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज लतीफ पिंजारी, मंगला महेश सोनवणे, फरीद मुशीर खान, साहिल अय्युब पठाण, आबीद नजीर शेख, वर्षा लोहार, कादरिया फाउंडेशनचे अध्यक्ष फारुख कादरी यांनी २ मार्च रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी यांच्याकडे संबधित वसतिगृहाची लेखी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी गंभीर आरोप केले. शिवाय यातील एका सदस्याने संबधित वसतिगृहातील एका महिलेची मोबाइलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डींग करुन व्हायरल केली होती. या व्हायरल व्हिडीओवरुन माध्यमांनी बातम्या केल्या. दरम्यान, ३ रोजी या प्रकरणाची समितीद्वारे चौकशी करण्यात आली. निवेदन देणाऱ्या नऊ जणांना सायंकाळी ५.३० वाजता अल्पबचत भवन येथे बोलावण्यात आले.

या नऊ जणांचे इनकॅमेरा जबाब नोंदवण्यात आले. यावेळी अनेकांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी आपला काहीच संबध नाही. निवेदन न वाचताच त्यावर सही केली आहे. निवेदानात काय लिहीले आहे याची कल्पना नसल्याची उत्तरे दिली. काहींनी आपण घटनास्थळी (वसतिगृहात) गेलोच नसल्याचे खळबळजनक उत्तरे दिली. दरम्यान, पोलिस व चौकशी समितीसमाेर या सर्व नऊ जणांना केेलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देता अाली नाहीत. त्यांच्या जबाबात तफावत आढळली. त्यामुळे या संघटनेचे आंदोलन अाणि निवेदन देण्याचा उद्देशच स्पष्ट नसल्याची बाब स्पष्टपणे या माध्यमातून समोर आली. त्या अनुशंगाने समितीने सर्वांचे जबाब पाकीटबंद करुन वरीष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले आहेत.

चौकशी अहवालातील महत्त्वाचे मुद्दे
वसतिगृहात २० फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम झाला. त्यानंतर अशाप्रकारे कार्यक्रम झाला नाही. त्या कार्यक्रमाचा त्या मुलीने संदर्भ दिला. त्यात तिने स्वत:हून कपडे बदलले. त्यावेळी कुणी पुरुष उपस्थित नव्हता.

तक्रारकर्त्यांचा ‘यू-टर्न’
आशादीपप्रकरणी तक्रार करणाऱ्या मंगला सोनवणे व पिंजारी हे गुरुवारी समितीच्या चौकशीसाठी अल्पबचत भवनात आले होते. त्यावेळी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. वसतिगृहातील प्रकाराच्या अनुषंगाने पोलिसांबाबत आमची तक्रार नव्हती. मात्र, माध्यमांनी वेगळेच दाखवले असे म्हणून त्रागा व्यक्त केला. आम्ही असे बोललोच नाही, असे म्हणून त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

जळगाव शहरातील शासकीय महिला वसतिगृहातील महिलेने गैरप्रकारांबाबत केलेल्या अाराेपांची सलग १८ तास समितीने चाैकशी केली. त्यानंतर बुधवारीच मध्यरात्री साडेतीन वाजता गृह विभागाला अहवाल पाठवला. त्यात अशी काही घटनाच घडली नसल्याचे समाेर अाले. मात्र, या कथित घटनेची भडक बातमी देणारे वृत्तपत्र खाेटे ठरले. तर घटनेच्या मुळाशी जाऊन तथ्य तपासून वस्तूनिष्ठ बातमी देणाऱ्या ‘दिव्य मराठी’च्या विश्वासार्हतेवर शिक्कामाेर्तब झाले अाहे.

‘त्या’ पीडितेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून व्हावे उपचार
दरम्यान, या घटनेत खिडकीतून आवाज देऊन तक्रार करणाऱ्या ‘त्या’ पीडितेवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार व्हावे. अशा आशयाचे पत्र गुरूवारी वसतिगृहाकडून वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आले आहे. पीडितेच्या हाताला दुखापत आहे तसेच मानसिक स्थिती कमकुवत असल्याचे पत्रात म्हटले आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार पुरावे देवू शकले नाहीत. निवेदनकर्त्यांनीही केवळ माहितीच्या आधारे निवेदन सादर केल्याचे समितीला सांगितले. तक्रारकर्ते त्यांच्या विधानावर कायम राहीले नाही. ते त्यांच्या विधानावरुन पलटले.

बातम्या आणखी आहेत...