आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भूगर्भातील जलस्तर वाढीसाठी अटल भूजल योजनेच्या 13 जिल्ह्यात जळगांवचा समावेश

पाडळसरे (वसंतराव पाटील)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगांव जिल्ह्यातील 4 तालुक्यातील निवड 114 गावात भुजल पातळी वाढीसाठी प्रयत्न

भूगर्भातील जलस्तर खालावलेल्या महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यातील 38 तालुक्यासाठी 1 हजार 443 गावात अटल भूजल योजनेच्या माध्यमातून जलसुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामाध्यमातून रिचार्ज शॉप्ट ,विहीर पुनर्भरण, सूक्ष्म सिंचन योजना राबवून भूजल पातळी वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या जलसुरक्षा आराखड्यातील 13 जिल्ह्यात जळगांवचा समावेश करून अमळनेर, पारोळा, यावल व रावेर या चार तालुक्यातील 114 गावात योजना राबविण्यात येईल. त्यात पाण्याचा अति उपसा झालेल्या व शोषित गावांची भूजल पातळी कमी झाल्याचे सर्वेक्षण करून निवड करण्यात आली असून १०० टक्के विहीर पुनर्भरण, रिचार्ज ट्रेंच, रिचार्ज शॉप्ट, माती नाला बांध, सिमेंट व दगडी बांध, सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब करून भूजल पातळी गाठण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.

ह्या योजनेची अंमलबजावणी होण्याआधीच मारवड विकास मंचने दोन वर्षांपासून माळण नदीत असे रिचार्ज शॉप्ट. लोकसहभागातून उभारून भूजल पातळीत वाढ घडवून आणली आहे ,त्यामुळे मारवड पॅटर्न म्हणून अमळनेर तालुक्यात याकडे सर्वांचा कल वाढला आहे. पावसाचे पडणारे पाणी वाहून जाते मात्र त्याचे भूजल पुनर्भरण पाहिजे त्या प्रमाणात होत नाही परिणामी फळ बागायत व शेतीच्या बागायती क्षेत्रात दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यामुळे भूगर्भातील पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर होऊन विहिरींसोबत कूपनलिकातुन उपसा केला जातो त्यामुळे भूगर्भातील भुजलसाठा कमी होत आहे. अनेक गावांचे पाणलोट क्षेत्र शोषित होऊन भूजल पातळी खोल खोल जात असून अनेक गावांत गुरांना व लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणी टंचाई निर्माण होऊन पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते.

शासन स्तरावर सर्वेक्षण करून अति शोषित, शोषित व अंशत शोषित अशी वर्गवारी करत राज्यातील भूजलस्तर खालावलेल्या 13 जिल्ह्यात 38 तालुक्यातील 1,443 गावांची निवड जलसुरक्षा आराखड्यात केंद्र सरकार पुरस्कृत अटल भूजल योजनेत करण्यात आली असून, योजनेची अंमलबजावणी केंद्र व राज्यसरकार संयुक्त करणार असून 2025 पर्यंत योजनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र व नाबार्डच्या माध्यमातून 925.77 कोटी रुपयांचा निधी अनुदान व प्रोत्साहन स्वरूपात राज्याला प्राप्त होणार आहे. त्यात भूजलाच्या शाश्वत विकासासाठी राज्य, जिल्हा व ग्रामपातळीवर संस्थात्मक अंमलबजावणी करण्यात येणार असून राज्य व केंद्राच्या मनरेगा ,प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना ,एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनच्या एकत्रित करून शाश्वत पाणीसाठासाठी काम केले जाईल

  • जलसुरक्षा आराखड्यात राज्यातील 13 समाविष्ट जिल्हे
  • जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर सातारा, सांगली, सोलापूर, जालना, लातूर, बुलढाणा, उस्मानाबाद, अमरावती, नागपूर
  • जळगांव जिल्ह्यातील चार तालुके आणि 114 गावात राबविण्यात येणार रिचार्ज शॉप्ट व विहीर पुनर्भरण

जिल्ह्यात 114 गावांचा समावेश
जळगाव जिल्ह्यातील फक्त अमळनेर तालुक्यातील 31, पारोळा 35, यावल तालुक्यातील 41 व रावेर तालुक्यातील 6 अशा एकूण 114 गावात गावात अटल भूजल योजनेच्या माध्यमातून भूगर्भातील भूजल पातळी वाढीसाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी केंद्रस्तरीय अटल भूजल योजना सुरू झाली आहे.

लोकांना जलसाक्षर करणे गरजेचे - संदीप वायाळ, गटविकास अधिकारी-अमळनेर
शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी पाणी आवश्यक आहे आणि पाणी पातळी बेसुमार उपशामुळे दिवसेंदिवस कमी होत आहे. मात्र भूगर्भातील जलपातळी टिकवून ठेवण्यासाठी अटल भूजल योजनेच्या माध्यमातून राज्याच्या विविध योजनांची एकत्रित येऊन आता विहीर पुनर्भरण, रिचार्ज शॉप्ट, नाला बांधून पाणी बचतीचे, शेतीसाठी सूक्ष्म सिंचन, पाणी बचत, वाहून जाणारे पाणी अडवून साठवून जिरवणे विविध उपक्रम राबवून लोकांना जलसाक्षर करणे आदी कामांवर भर दिला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...