आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:जळगावकरांनो, जीवघेण्या वाळू वाहतुकीपासून आता आपल्यालाच राहावे लागेल असे सावध

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यकर्ते आणि प्रशासनाकडेही अवैध वाळूला रोखण्याची इच्छाशक्तीच नाही.
  • मध्यरात्री तीन तासांत गिरणा नदीपात्रातून 70 ट्रॅक्टर, 26 डंपर वाळूतस्करी करताना दिसले.
  • चौपदरी महामार्गावर डंपरचा वेग ताशी 8 ते 110 किमी.

काळे सोने अर्थात वाळूची अवैध वाहतूक रोखली जाण्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती ना राज्यकर्त्यांमध्ये आहे, ना प्रशासनात. किंबहुना, राज्यकर्त्यांचेच आप्तस्वकीय त्या धंद्यात गुंतलेले आहेत हे उघड गुपित आहे. त्यामुळे अवैध वाळू वाहतूक बंद होईल, अशी अपेक्षा करण्यात अर्थच राहिलेला नाही. ती बंद होणार नाही, हे वास्तव स्वीकारून या जीवघेण्या वाहतुकीत निदान आपला जीव सुरक्षित राहावा, एवढी काळजी तर आपण घेऊच शकतो. त्यासाठीच जळगावकरांना सावध करणारा ‘ग्राउंड रिपोर्ट’.

‘दिव्य मराठी’च्या चमूने रात्री १०.३० ते १.३० असे तीन तास स्टिंग ऑपरेशन केले. त्यात गिरणा नदीपात्रातून ७० ट्रॅक्टर, २६ डंपर्स वाळूतस्करी करताना आढळून आले. शहरातील गिरणा पंपिंग व वाघनगर परिसरातील कच्चे रस्ते उखडत रात्री १०.३० वाजता एकापाठोपाठ १५ ते २० ट्रॅक्टर गिरणा नदीपात्रात उतरले. पुढे जाण्यासाठी त्यांच्यात जीवघेणी चढाओढ सुरू होती. रस्त्यावरून धावणाऱ्या इतर वाहनांचा विचार न करता बेदरकारपणे त्यांनी नदीपात्र गाठले. महसूल असो की पोलिस, कुणाचाही धाक न बाळगता रात्री ११ वाजेपासून वाळू भरलेले एकेक ट्रॅक्टर नदीपात्रातून बाहेर आले.

रेल्वे रुळाला लागून असलेल्या कच्च्या रस्त्याने कोल्हे हिल्सच्या पाठीमागून कर्णकर्कश हॉर्न वाजवत ते वाघनगरातील रहिवासी भागातील रस्त्यावर पोहोचले. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यांनी प्रत्येकी तीन ते चार फेऱ्या मारल्या. अर्थात, ७० ते ८० ट्रॅक्टर वाळूतस्करी या कालावधीत झाली. विशेष म्हणजे वाळूतस्करीला कुणी विरोध करू नये म्हणून व पोलिस, महसूलच्या पथकांवर लक्ष ठेवण्यासाठी एक टोळके सिद्धिविनायक चौकात मद्याचे पेग रिचवत असताना बसलेले दिसले. वाघनगर भागातून वाळू भरलेली ही वाहने शहरातून पुढे महामार्गावर भुसावळकडे जाताना दिसली. अजिंठा चौफुली ओलांडल्यावर या वाहनांचा वेग वाढला. तरसोद फाट्यापर्यंत महामार्ग चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.

या ठिकाणापासून ते भुसावळ व पुढे वरणगाव, मुक्ताईनगरच्या दिशेने हे वाळू भरलेले डंपर भरधाव निघाले. त्यांचा वेग सरासरी ताशी ११० किलोमीटर असण्याचा अंदाज आहे. महामार्गावरून गिरणा नदीपात्रात रात्री ११.२० ते १.३० अशा दोन तासांत अवैध वाळू वाहतूक व उपसा करण्यासाठी जवळपास ताशी ८० किलोमीटर वेगाने जाणारे २६ डंपर उतरले. खोटेनगर थांब्याजवळ धरणगाव, बांभोरीकडून वाळूतस्करीसाठी येणारी वाहने ‘दिव्य मराठी’च्या चमूने मोजली.

रात्री ११ वाजेनंतर महामार्गावरून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या विना क्रमांकाचे डंपर जळगाव शहराकडे येण्यास सुरुवात झाली. ११.२० वाजता वाळूने भरलेले विना क्रमांकाचे दोन भरधाव डंपर जळगावकडे तर एक रिकामे डंपर जळगावकडून बांभोरीकडे गेले. खोटेनगर थांब्याजवळ महामार्गावर गतिरोधक आहे. जिल्ह्याबाहेरील वाहने त्या गतिरोधकावर ब्रेक न मारल्याने जोरात आदळताना दिसली. डंपरचालक त्यांचे वाहन गतिरोधकाच्या बाजूने नेत होते.

खोटेनगर थांब्याजवळ रात्री गस्तीवरील पोलिस कर्मचारी थांबलेला होता. १२.१६ वाजता पोलिस कर्मचारी तेथून निघून गेला. रात्री ११.२० ते १.३० अशा दोन तास १० मिनिटांत गिरणा नदीपात्राकडून जळगावकडे अवैध वाळूने भरलेले १२ भरधाव डंपर गेले.

अवैध उपसा करून वाहतूक करण्यासाठी विना क्रमांकाचे १४ डंपर जळगावकडून बांभोरी, धरणगावकडे गेले. एक वाजून ३१ मिनिटांनी प्रतिनिधी तेथून निघून जात असतानाही अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर्सची ये-जा सुरूच होती. वेगवान डंपर मोबाइल कॅमेऱ्यात टिपले जात नव्हते. चौपदरी महामार्गावर नशिराबाद गावाजवळ रात्री १२.३० ते १.३० वाजेपर्यंत थांबलाे असता महामार्गावरून ताशी ९० ते ११० किलोमीटर वेगाने धावणारे २४ डंपर दिसले.

जळगाव शहरातून भुसावळ, जामनेर, एरंडाेलकडे जाणारी वाळूतस्करीची वाहने जीवावर उठल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अगदी अलीकडेच घडलेल्या काही ठळक घटना डोळ्यासमोर आणल्या तर अवैध वाळू वाहतूक कशी जीवघेणी झाली आहे हे वेगळे सांगायची गरज राहत नाही. या संदर्भात उदाहरणार्थ दिलेल्या तीन घटना समाेर ठेवल्या तरी पुरे होईल. हे आहेत धोके

ही वाहतूक वाहनात क्षमतेपेक्षा किती तरी अधिक वजनाची वाळू भरून केली जाते आहे. त्यामुळे कोणत्याही वाहनाचा कोणत्याही क्षणी अपघात होण्याचा धोका आहे. ही वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांवर त्यांच्या क्रमांकाची नोंद आढळली नाही. त्यामुळे अपघात करून पळून जाणाऱ्या वाहनाचा आणि त्याच्या चालकाचा कधीही शोध लागू शकत नाही. या वाहनांचा वेग चौपदरी महामार्गावर ९० ते ११० किलोमीटर ताशी इतका असल्याचे आढळून आले. हा अवजड वाहनांसाठी अत्यंत धोकादायक वेग आहे. नागरी वसाहतींमधून कच्च्या रस्त्यांवरून ही वाहने समूहाने धावतात. शर्यत लागल्याप्रमाणे वाहने पळवत असल्याने ती अनियंत्रित होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. या वाहनांपैकी बहुतेकांच्या मागे रिफ्लेक्टर लावलेले नाहीत, असेही आढळून आले. त्यामुळे इतर वाहनांसाठी रात्रीच्या वेळी ही वाहने धोकादायक आहेत.

तीन प्रमुख घटना
घटना क्र. १ :
भुसावळ रस्त्यावर स्कूटरने रोज जळगाव- भुसावळ असे ये-जा करणारी एक परिचारिका भरधाव डंपरच्या खाली येऊन जागीच गतप्राण झाली. रस्त्याच्या कडेने जात असतानाही तिला डंपर चिरडून पुढे गेला.

घटना क्र. २ : गणेश कॉलनी थांब्यावर महसूल अधिकाऱ्याची गाडी पाठलाग करते आहे या शंकेने एका वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाने चालते ट्रॅक्टर रस्त्यावर सोडून पळ काढला. हे ट्रॅक्टर पुढे जाऊन दुसऱ्या ट्रॅक्टरला धडकले. त्यात एका रिक्षाचा चुराडा झला. एका क्षणामुळे रिक्षाचालक बालंबाल बचावला.

घटना क्र. ३ : जळगाव शहरात अशाच एका ट्रॅक्टरचालकाने दुसऱ्या घटनेत घाबरून चालते ट्रॅक्टर रस्त्यावर सोडून पळ काढला. नागरिकांच्या सुदैवाने हे ट्रॅक्टर पुढे जाऊन कलंडल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

व्हायब्रेशनने दुचाकीस्वाराचे सुटते नियंत्रण, धोका जास्त

शहरातील रस्ते अरुंद आहेत. त्यातच डंपरचा वेग ताशी १०० किलोमीटर असला तर बाजूने जाणाऱ्या वाहनाला धोका निर्माण होतो. जागा कमी असल्याने दुचाकी जवळून जात असताना वेगामुळे गाडी व्हायब्रेट होते. त्यात अनेकदा दुचाकीस्वार घाबरून जातात. ज्यामुळे त्यांचे गाडीवरचे नियंत्रण सुटते व अपघात होतात. डंपरच्या मागील बाजूस हवा आल्याने दुचाकी चालवताना अडथळे निर्माण होतात. - प्रा. कृष्णा श्रीवास्तव, मॅकेनिकल विभाग, एसएसबीटी महाविद्यालय, जळगाव

शहरात हे चौक ठरू शकतात जीवघेणे

अवैध वाळूतस्करांच्या अनियंत्रित व बेकायदा वाहतुकीमुळे खरे तर संपूर्ण जिल्हाच धोकादायक पातळीवर आला आहे. पण शहराचा विचार केला तर काही चौक आणि नागरी वसाहतीतील रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. त्यात वाघनगर, खोटेनगर, शिवकॉलनी, अग्रवाल चौफुली, आकाशवाणी चौक, इच्छादेवी चौक, अजिंठा चौफुली, कालिंका माता चौक, तरसोद फाटा यांचा समावेश होतो. नागरिकांनी रात्री साडेदहा वाजेनंतर या रस्त्यावर येण्याचा ‘गुन्हा’ करू नये असेच जणू हे वाळू तस्कर सुचवत राहातात.

ही आहेत शहरातील अगदी अलीकडची उदाहरणे
अशा किती तरी घटना सतत घडत असतात. त्या घटनांपैकी एखादीही घटना आणखी कोणाचा जीव घेऊ नये यासाठी ‘टीम दिव्य मराठी’ ने धोकादायक वाहतुकीच्या काही ठिकाणांवर मध्यरात्री थांबून काही नोंदी घेतल्या आहेत. त्याद्वारे जळगावकरांना कुठे सावध राहायचे, काय करायचे आणि काय नाही हे सांगण्याचा हा प्रयत्न आहे.

बातम्या आणखी आहेत...