आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेने करुन दाखवले:जळगाव मनपावर सेनेचा भगवा; भाजपला धक्का, जयश्री महाजन महापाैर, कुलभूषण पाटील उपमहापाैर

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेनेच्या जयश्री महाजनांनी भाजपच्या प्रतिभा कापसे यांचा पराभव करत महापौरपद मिळवले.

जळगाव महापालिकेवर अडीच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपला खिंडार पाडत शिवसेनेने भगवा फडकवला आहे. भाजपच्या २७ बंडखाेरांचा पाठिंबा मिळवत १५ मतांच्या फरकाने शिवसेनेने सत्तेचा साेपान सर केला. महापाैरपदी जयश्री महाजन, तर उपमहापाैरपदी कुलभूषण पाटील यांचा विजय झाला. हा ‘सांगली पॅटर्न’ यशस्वी झाल्याने भाजपला सत्ता गमवावी लागली.

अडीच वर्षांसाठी महापाैर निवडीकरिता गुरुवारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आॅनलाइन विशेष महासभेत ही निवड प्रक्रिया पार पडली. या वेळी आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह पालिकेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती हाेती.

अखेर ज्याेती चव्हाण शिवसेनेकडे... : चार दिवसांपूर्वी भाजपत खिंडार पडल्यानंतर भाजपने पक्षाच्या नगरसेवकांना नाशिक व इगतपुरी येथे हलवले हाेते. यादरम्यान नाशिक येथे नगरसेवकांचा हाॅटेलात वाद झाला हाेता. त्यानंतर नगरसेविका ज्याेती चव्हाण यांच्या मिसिंगची तक्रार झाली. हा चर्चेचा विषय ठरला हाेता. दरम्यान, ज्याेती चव्हाण बुधवारी रात्री शिवसेनेच्या ताफ्यात आल्या. त्यामुळे बुधवारी बहुमताचा ४४ वर पाेहाेचलेला आकडा ४५ वर गेला.

जळगावकरांना खड्ड्यातून बाहेर काढणार...
भाजपने गेल्या अडीच वर्षांपूर्वी जळगावकरांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. केवळ घाेषणा केल्या. मात्र एकही विकासाचे काम करू शकले नाही. त्यामुळे भाजपतील नगरसेवकांत अस्वस्थता हाेती. त्यामुळे आधी गेले काही दिवस खड्ड्यात गेलेल्या जळगावकरांना खड्ड्यातून बाहेर काढण्यात येईल. रस्त्यांच्या कामांना प्राधान्य दिले जाईल. -जयश्री महाजन, नवनियुक्त महापाैर
उपमहापाैर पाटील

बहुमतापेक्षा सात मते जास्त... : महापाैर व उपमहापाैरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपतून फुटलेले २७ नगरसेवक व एमआयएमच्या पाठिंब्यानंतर शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना ४५ मते मिळाली, तर प्रतिस्पर्धी भाजपच्या प्रतिभा कापसे व सुरेश साेनवणे यांना ३० मते मिळाली. १५ मतांच्या फरकाने भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली. अवघ्या १५ नगरसेवक असलेल्या शिवसेनेच्या व्यूहरचनेने सभागृहातील सत्ताधारी पक्षाचे संख्याबळ तिप्पट वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...