आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे आंदोलन:जळगावात राष्ट्रवादीचे जोकरच्या हस्ते केक कापून आंदोलन; एप्रिल फूल म्हणत साजरा केला मोदी दिवस

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रातील मोदी सरकारच्या सत्तेला आठ वर्षांचा कालावधी लोटला आहे.पंतप्रधान मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला दिलेली आश्वासने एप्रिल फूल ठरली आहेत. सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी सरकार महागाईचे चटके देत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विदुषकाच्या हस्ते केक कापून प्रतिकात्मक एप्रिल फूल मोदी दिवस साजरा केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रिकू चौधरी यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकारचा निषेध करुन घोषणाबाजी केली. गॅस सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. महागाईच्या झळा सर्वसामान्यांना सोसाव्या लागत आहेत. बेरोजगारीसह महागाईचा उच्चांक वाढत आहे. मोदी सरकार केवळ घोषणाबाजी करीत आहे. त्या एप्रिल फुलसारख्या ठरत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजचा दिवस एप्रिल फूल मोदी दिवस म्हणून साजरा केल्याचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी सांगितले.

मोदींना वाटते जनता आपल्या इशाऱ्यावर नाचते... मोदींनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत. मोदी जनतेला जोकर समजत आहेत. त्यांना वाटते लोक त्यांच्या इशाऱ्यावर नाचते. त्यामुळे ते आश्वासने देऊन मोकळे होत आहेत. मागच्याच आश्वासनांची पूर्तता झालेली नसताना नवीन आश्वासनांचा भडिमार करीत आहेत. त्यांच्या आश्वासनांना आता जनता कंटाळली आहे. त्यांना महागाई पासून दिलासा, युवकांच्या हाताला काम हवे आहे. आता बस झाली जुमलेबाजी आता कामे करा, बेरोजगारांना नोकऱ्या द्याव्यात, आश्वासनाची पूर्तता करावी अशी मागणी चौधरी यांनी केली. त्यानंतर विदूषकाच्या हस्ते केक कापून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी एप्रिल फूल मोदी दिवस साजरा केला. हा प्रतीकात्मक दिवस साजरा करीत असताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.