आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:भरचौकात गाेळ्या घालण्याची धमकी देत मागीतली 2 लाख रुपयांची खंडणी, ममुराबाद येथील घटना

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो, तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत, त्यामुळे आम्हाला पैसे द्या अन्यथा तुझ्या भावाला विदगावच्या भरचौकात गोळ्या घालू’ अशी धमकी देत तरुणास दोन लाख रुपयांची खंडणी मागीतल्याचा प्रकार तालुक्यातील ममुराबाद येथे आज घडला.

या प्रकरणी खंडणी मागणाऱ्या अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी, सचिन रतन सोनवणे (दोघे रा .विदगाव ता. जळगाव) या दोघांच्या विरुद्ध सोमवारी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भगवान कोळी (वय ४३, रा. विदगाव) यांनी या संदर्भात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, ९ एप्रिल रोजी १.१० वाजेच्या सुमारास भगवान कोळी हे घरी असतांना अनिल उर्फ बंडु भानुदास कोळी आणि सचिन रतन सोनवणे यांनी अनधीकृतपणे घरात प्रवेश केला. त्यानंतर भगवान कोळी यांना म्हटले की, ‘तुझा भाऊ बिल्डरशीपचा व्यवसाय करतो. तू देखील आता कपाशी व गहु विकलेला आहे. तुमच्याकडे पैसे जास्त आहेत. तुझा भाऊ जनार्दन कोळी हा अंगात सोने घालून फिरतो. आम्ही त्याला एखादवेळी बंदुकीच्या गोळ्या घालून जिवे ठार मारुन त्याचे आंगावरील सोने लुटू. त्यापेक्षा तुला जर तुझा भाऊ प्रिय असेल तर दोन दिवसाचे आत आम्हाला दोन लाख रुपये दे. नाहीतर त्याचा विदगाव येथे भरचौकात गोळ्या घालून खुन करु’, असे म्हणत अश्लील शिवीगाळ केली.

एवढेच नव्हे तर आम्ही आताच एका दरोड्याच्या गुन्ह्यातुन जेलमधून सुटून आले आहोत. आमचे कोणीही काहीही करु शकत नाही, अशी धमकी देऊन शिवीगाळ व धक्काबुक्की करुन भगवान कोळी यांच्याकडे पैशांची मागणी केली. या घटनेनंतर कोळी यांनी सोमवारी तालुका पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव मराठे तपास करीत आहेत.