आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या प्रकरण:...अन् सरणावर लावले त्यांचे लग्न, जिवंतपणी नाही, मात्र मृत्यूनंतर लावले स्मशानात प्रेमीयुगुलाचे विधिवत लग्न!

भडगाव (जि. जळगाव)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जळगाव जिल्ह्यातील घटना, मैत्रीदिनीच संपवले जीवन

प्रेमाच्या आणाभाका घेतल्या अन् सुखी संसाराची स्वप्नेही रंगवली, मात्र कुटुंबीयांनी प्रेमविवाहास नकार दिल्याने वाडे (ता. भडगाव) येथील एका प्रेमीयुगुलाने मैत्रीदिनीच आत्महत्या केली. मुकेश कैलास सोनवणे (२२, रा. वाडे) व नेहा बापू ठाकरे (१९, मूळ गाव पाळद, ता. मालेगाव, ह.मु. वाडे) असे मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. दरम्यान, जिवंतपणी प्रेमविवाहास नकार देणाऱ्या कुटुंबीयांनी मृत्यूनंतर मात्र या प्रेमीयुगुलाची विवाहाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना अग्निडाग देण्यापूर्वी स्मशानभूमीत विधिवत लग्न लावून दिले. या वृत्तास वाडे येथील पोलिस पाटलांनी दुजोरा दिला आहे.

या घटनेबाबत गावातून मिळालेली माहिती अशी की, नेहा व तिचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून वाडे या मामाच्या गावी वास्तव्यास आले होते. येथे तिची ओळख मुकेश याच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर मुकेश व नेहा यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघेही अनेकदा बाहेर फिरण्याच्या निमित्ताने भेटायचे. मात्र, दोघांच्या कुटुंबीयांना त्यांच्या प्रेमसंबंधाची माहिती मिळाली. दोघेही एकाच समाजाचे असल्याने मुलाकडून मुलीच्या कुटुंबीयांकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, मुलगा नात्याने चुलत मामा लागतो. त्यामुळे नेहाच्या कुटुंबीयांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर तिच्या लग्नासाठी वर संशोधन सुरू झाले. तसेच मुकेशच्या कुटुंबीयांकडूनही मंगळवारी लग्नाची बोलणी होणार होती. त्यामुळे आता आपला प्रेमविवाह होणार नाही हे स्पष्ट झाल्याने मुकेश व नेहा या दोघांनी वाडे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्यात लोखंडी सळईला दोरी बांधून रविवारी (१ ऑगस्ट) पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान आत्महत्या केली.

मुकेशचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. त्यानंतर तो शेती करायचा. नेहाही शेतात जात असे. दोघांच्या कुटुंबाची स्थिती जेमतेम आहे. मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, तर नेहाच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण व भाऊ आहे.

व्हॉट‌्सअॅप स्टेटसवर ‘बाय’चा मेसेज : मुकेश याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट‌्सअॅप स्टेटसवर ‘बाय’ असा मेसेजही ठेवला होता. त्यानंतर पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळी चिठ्ठी व इतर काहीही अाढळून अाले नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

मृत्यूनंतर दोघांची प्रेमविवाहाची इच्छा केली पूर्ण
शवविच्छेदनानंतर मृतदेह वाडे गावात आणण्यात आले. त्यानंतर दोघांच्या घरून वेगवेगळी मात्र एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आले. दोघांची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर मृत्यूनंतर स्मशानभूमीत दोघांचे विधिवत लग्न लावून देण्यात आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी व पोलिस पाटील अरविंद पाटील यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली.

बातम्या आणखी आहेत...