आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुद्ध पौर्णिमेच्या दिवशी समाज माध्यमांवर पोस्ट लिहिताना उत्कट भावनावेगात तथागत गौतम बुद्धांना ‘बाॅयफ्रेंड’ संबोधणे तृतीयपंथी शमिभा पाटील यांना अचानक राज्यभरात चर्चेत घेऊन आले आहे. शमिभा या वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्य असून, तृतीयपंथी कल्याण मंडळाच्याही सदस्य आहेत.
त्यांच्या या पोस्टच्या समर्थनात अनेक मान्यवर उतरले असले तरी ‘ट्रोलकरी’ मात्र, अत्यंत गलिच्छ भाषेत त्यांच्यावर टीका करण्यासाठी सरसावले आहेत. जळगाव येथील तृतीयपंथी शमिभा पाटील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या असल्या तरी सर्वसामान्यांमध्ये फारशा परिचित नव्हत्या.
बुद्ध जयंतीच्या दिवशी त्यांनी समाज माध्यमामध्ये तथागत गौतम बुद्धांना वंदन करताना व्हायोलिनजवळ बसलेल्या बुद्धांच्या फोटोसह पोस्ट केली. त्यावर ‘तू कायम होतास, आहेस व राहणार. डियर बॉयफ्रेंड बुद्धा, हॅपी बर्थ डे!’ अशा ओळी लिहिल्या आहेत. या पोस्टनंतर त्यांना राज्यभरातून ट्रोल करायला सुरुवात झाली. त्याचवेळी प्रख्यात कवयित्री डाॅ. प्रज्ञा दया पवार यांनी शमिभाचे समर्थन केले.
डाॅ. पवार लिहितात, ‘बुद्धाला बॉयफ्रेंड म्हणण्याची, मानण्याची आणि त्याचा जाहीर उच्चार करण्याची मानसिकता कशातून आकार घेते हे समजून न घेताच शमिभाच्या वक्तव्यावर अतिशय हिणकस, गलिच्छ पद्धतीने तुटून पडणाऱ्या सर्वांनी बुद्ध पुन्हा समजून तर घ्यावाच शिवाय संपूर्ण भक्ती-साहित्य, विशेषत: स्त्रीरचित भक्ती साहित्य नक्की वाचावं’.
पवार यांच्या या प्रतिक्रियेलाही अनेकांनी पसंती दर्शवली आहे. दिशा पिंकी शेख यांनीही आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्या म्हणतात,‘बुद्धाला आपलं मानणारे माझे काही मित्र माझ्याबद्दल, माझ्या समुदायातील बुद्धाला स्वत:च्या आकलन आणि अनुभवावरून चाचपडणाऱ्या मैत्रिणींना निकृष, हिंसक,असूयायुक्त दृष्टीने पाहतात याची जी काही वेदना होतेय ती असह्य आहे.
क्षमा करा पण आम्ही आमच्यातल्या बुद्धाशी आमचं नातं सांगतो आहोत आणि तुम्ही सूत्रबद्ध तत्त्वज्ञानाच्या चौकटीत तपासू पाहताय. तुमच्याशी हरले मी पण स्वत: सोबतचा शोध कायम राहील.’
माझ्याबाबत गलिच्छ वक्तव्य करणाऱ्यांना गौतम बुद्धांचे त्रिशरण, पंचशीलचा अर्थ तरी कळलेला आहे काय? भावनिक, मानसिक व वैचारिक समतोल साधण्यासाठी बुद्धांचे विचार उपयोगी आहेत. परमकल्याण मित्र बुद्धाला बॉयफ्रेंड म्हटले तर एवढे वादंग उठले. हे नाते न समजून घेताच वक्तव्य करणाऱ्यांची मी माफी मागणार नाही. सम्यक दृष्टीने चर्चा करायला तयार आहे.
- शमिभा पाटील, वंचित बहुजन आघाडी, जळगाव
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.