आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेवाढीनंतरही सामान्यांचा एसटीवर विश्वास:दिवाळीत जळगाव विभागाचे विक्रमी उत्पन्न, 11 कोटी 32 लाखांची कमाई

प्रतिनिधी | जळगाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीच्या काळात एसटीने २१ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १० टक्के भाडेवाढ केली होती. भाढेवाढ झाली तरी प्रवाशांनी एसटीवर विश्वास दाखवला. यात जळगाव विभागाने विक्रमी उत्पन्न मिळवत राज्यात पहिला नंबर मिळवला.

नाशिक प्रादेशिक विभागात चोपडा आगाराने नंबर एक तर चाळीसगाव आगार नंबर दोनवर आला. १० दिवसांत जिल्ह्यामध्ये एसटी ३० लाख ८६ हजार किलोमीटर फिरली. यातून एसटीला ११ कोटी ३२ लाख ७१ हजार उत्पन्न मिळाले.

कोरोना व एसटी कर्मचारी संपामुळे गेल्या दोन वर्षांत एसटीचे मोठे नुकसान झाले. गेल्या वर्षी ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीची चाके जागेवरच थांबली होती. या दोन वर्षांत कोरोना व संप यामुळे माहेरवाशीण माहेराला मुकली होती. त्यामुळे यंदा माहेरवाशीण, ज्येष्ठ नागारिक व अमृत वर्षातील सवलतीतील ज्येष्ठ नागरिकांमुळे प्रवाशांची संख्या वाढून एसटीच्या उत्पन्नात भर पडली. दिवाळीत जिल्ह्यातील ११ स्थानकांतून एसटीने ३० लाख ८६ हजार किलोमीटर प्रवास करत ११ कोटी ३२ लाख ७१ हजारांचे उत्पन्न मिळवले. हे उत्पन्न महाराष्ट्रात १ नंबरवर राहिल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.

एका दिवसाच्या उत्पन्नातही नंबर १

जळगाव एसटी विभागाने भाऊबिजेच्या दिवशी उत्पन्नाबाबत संपूर्ण राज्यात बाजी मारली होती. २६ ऑक्टोबरला भाऊबिजेच्या एका दिवसात एसटीने उभ्या महाराष्ट्रात २ लाख ९० हजार किलोमीटर फिरून १ कोटी १९ लाख विक्रमी उत्पन्न मिळवले होते. हे उत्पन्न उभ्या महाराष्ट्रात नंबर एकचे तर आतापर्यंतच्या इतिहासात एका दिवसाचे सर्वाधिक उत्पन्न होते. हे उत्पन्न २०१९ मधील भाऊबिजेच्या एका दिवसाच्या उत्पन्नापेक्षा ११ लाखाने अधिक आहे.

४४ आगारात चोपडा अव्वल

एसटीच्या नाशिक प्रादेशिकस्तरावरील ४४ आगारांत २० ते ३१ ऑक्टोबरदरम्यान चोपडा आगाराने नंबर एक मिळवला आहे. तर चाळीसगाव आगार द्वितीय आले आहे. चाळीसगाव आगाराने ३ लाख ८३० किलोमीटर फिरून १ कोटी ७४ हजार ९०८ उत्पन्न मिळवले आहे. यात प्रवासी १९७९०४ तर अमृत योजनेतील प्रवासी १८९२८ असून २१६८३२ एवढ्या प्रवाशांनी या दरम्यान एसटीतून प्रवास केला, अशी माहिती चाळीसगाव आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...