आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउस्मानियॉ पार्क येथील विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी 7 वाजता समोर आली आहे. दरम्यान, सासरच्या लोकांनी शारीरिक, मानसिक छळ केल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप मृत विवाहितेच्या आई-वडीलांनी केला आहे.
सना तौसीफ मिस्तरी (वय 21, रा. उस्मानिया पार्क, शिवाजीनगर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, सना तौसिफ मिस्तरी ह्या उस्मानिया पार्क येथे पती, सासू आणि सासरे यांच्यासह राहत होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या घरात कौटुंबिक वाद सुरू होते. या वादासंदर्भात सना यांनी वडील मजीद शेख सांडू यांना सांगितले होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच सनाने आपल्या आईवडीलांशी शेवटचे बोलणे झाले होते. त्यावेळी देखील घरात वाद सुरू असून छळ होत असल्याची तक्रार सनाने केली होती.
यानंतर मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सर्वजण झोपलेले असतांना सना यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. बुधवारी सकाळी 7 वाजता ही घटना उघडकीला आली. दरम्यान, पतीसह सासरच्या मंडळींच्या त्रासातून मुलीने आत्महत्या केली. असा आरोप सनाचे वडील मजीद शेख सांडू व आई शबाना मजीद शेख सांडू यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी सनाच्या नातेवाईकांनी केली आहे. या घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात माहेरकडील नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रवींद्र सोनार तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.