आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजूनच्या पहिल्याच पंधरवड्यात मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करणाऱ्या जळगावकरांना पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा फटका बसला आहे. रविवारी जळगावात उच्चांकी ४३ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले. शनिवारच्या तुलनेत २ अंशांनी तापमान वाढल्याने दिवसभर उष्णतेच्या झळांनी हैराण केले होते.
उत्तरेत आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे दिल्लीसह उत्तरेतील राज्यांत तापमान ४५ अंशांपर्यंत वाढले आहे. मान्सून दक्षिणेतून पुढे आगेकूच करत असताना उत्तरेत मात्र उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे. त्याचा फटका महाराष्ट्रालाही बसला असून, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात पुन्हा उष्णता वाढली आहे. रविवारी जळगावात ४३ अंश सेल्सिअस उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. दिवसभर उकाड्याने नागरीक हैराण झाले.
पंधरवड्यात पुन्हा तापमान वाढले
मे महिन्यात ४५ अंशांवर गेलेले तापमान १६ मे राेजी ४३ अंशांपर्यंत खाली आले होते. त्यानंतर तापमानात घट होऊन पारा ४० अंशांखाली आला होता. जून महिन्यात त्यात पुन्हा वाढ झाली असून, रविवारी ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. रविवारी वाऱ्याचा वेगही ताशी २२ किमी एवढा तर आर्द्रता १४ टक्क्यांवर होती. दुपारी १ वाजेलाच पारा ४२ अंशांवर पोहोचल्याने दिवसभर उष्णतेच्या झळा तीव्रतेने जाणवत होत्या. सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत आकाशात कृष्णमेघांनी गर्दी केली होती. रात्री १२ वाजेनंतर मात्र गारवा जाणवला.
सोमवारपासून पूर्वमोसमी पाऊस
दक्षिणेतून उत्तरेकडे आगेकूच करणारा मान्सून काहीसा मंदावल्याने त्याचे खान्देशातील आगमनही लांबण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता सोमवारपासून पूर्वमाेसमी पावसाच्या सरी कोसळतील. तर ८ जूननंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.