आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविकास कामांसाठी प्राप्त निधी वेळेत खर्च न करण्याची मनपाला जणू सवयच झाली आहे. २०० काेटींची मलनिस्सारण याेजनाही त्याला अपवाद ठरलेली नाही. ४६ काेटींचा खर्च झालेला मलप्रक्रिया प्रकल्प वर्षभरापासून पूर्ण झाला आहे; परंतु केवळ मनपाने दाेन वर्षे उशिराने निविदा प्रक्रिया राबवल्याने आजपर्यंत वीज जाेडणी झालेली नाही.
त्यामुळे वाढीव खर्चाचा एक काेटींचा भारदेखील सहन करावा लागला आहे. हा जनतेच्या पैशांचा चुराडाच आहे. आता वीज जाेडणीसाठी दाेन महिन्यापासून प्रस्ताव मंत्रालयात पडून आहे; परंतु मंजुरीसाठी राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव जाणवत अाहे. अमृत अभियानांतर्गत जळगाव शहरासाठी २०१९ मध्ये मलनिस्सारण याेजना (भुयारी गटार) मंजूर झाली. पहिल्या व चाैथ्या झाेनमध्ये अर्थात शहराच्या ४० टक्के लाेकसंख्येला पुरेल एवढी ही याेजना आहे. २०० किमी लांबीच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या व्यासाचे मलवाहिनी टाकून भुयारी गटारी तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे आराेग्य सुधारणार आहे. यासाठी याेजना कार्यान्वित हाेणे गरजेचे असून, नगरविकास विभागाकडे वीज जाेडणीचा प्रस्ताव प्रलंबित आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हे खाते आहेे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यांच्याकडून प्रयत्नांची अपेक्षा हाेत आहे. याबाबत पालकमंत्र्यांशी संपर्क हाेऊ शकला नाही. महापाैर जयश्री महाजन यांनी प्रकल्प कार्यान्वित न हाेण्यामागे बदललेली राजकीय समीकरणे कारणीभूत असल्याचे सांगितले. प्रस्ताव पाठवूनही शासन दुर्लक्ष करीत असल्याचा अाराेप केला आहे. तर आमदार सुरेश भाेळे यांनी आराेप फेटाळून लावत ही तांत्रिक बाब आहे. त्यासाठी आजपर्यंत प्रशासनाने मदत मागितली नाही असे सांगितले.
वीज जाेडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून १ काेटी ५७ लाख रुपयांचे अंदाजपत्रक मनपाला प्राप्त झाले हाेते. २३ सप्टेंबर २०२१ला मजीप्राकडून मान्यता मिळाली. १ काेटी ५५ लाख रुपयांच्या खर्चाच्या प्रस्तावानुसार १९ सप्टेंबर २०२१ राेजी राज्य समितीने मान्यता दिली हाेती; परंतु सात वेळा निविदा प्रसिद्ध करूनही प्रतिसाद मिळाला नाही.
याेजना सुरू झाल्यावर २३ महिन्यांनी हालचाली
मलनिस्सारण याेजनेला १२ फेब्रुवारी २०१९ राेजी प्रशासकीय मान्यता मिळाली अाहे. २१ अाॅगस्ट २०१९ राेजी मे. एल.सी. इन्फ्रा प्राेजेक्टस या कंपनीला कार्यादेश दिले हाेते. शहरात प्रत्यक्षात भुयारी गटारीचे व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर मनपाने प्रकल्पासाठी लागणाऱ्या विद्युत जाेडणीसाठी २३ महिन्यांनी अर्थात २७ जुलै २०२१ राेजी सुरुवात केली हाेती.
उशिरा प्रक्रिया राबवल्याने खर्चाचा भार :
वीज जाेडणीसाठी वीज वितरण कंपनीकडून २०१८-१९चे दर देण्यात अाले हाेते. ते जुने व कमी असल्याने तसेच अाजच्या बाजार भावानुसार अंदाजपत्रकातील स्टील, काॅपर व अॅल्युमिनियम यांच्या दरात वाढ झाल्याने मक्तेदार लक्ष्मीछाया इलेक्ट्रिकल यांनी अंदाजपत्रकीय रकमेवर ४६ % जास्त दराने काम करण्याची तयारी दाखवली. कामाची गरज, शासनाच्या अन्य विभागांकडून हाेणारा दंडाची रक्कम पाहता निर्णय झाला. त्यात अंदाजपत्रकीय रक्कम १ काेटी ३१ लाख ७३ हजार रुपये दरावर ४६ टक्के जास्त म्हणजे १ काेटी ९२ लाख ३४ हजार तसेच जीएसटी असा २ काेटी २६ लाख ९६ हजार रुपये खर्चास मान्यता दिली अाहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.