आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगाव:नवे कुलगुरू कोण होईल हे सर्वस्वी राज्यपालांच्या स्वाक्षरीवर अवलंबून

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू असून इच्छूक पात्र उमेदवारांच्या अर्जांची छाननी झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आत राज्यपालांनी नव्या विद्यापीठ कायद्याच्या संमत विधेयकावर स्वाक्षरी केली तर नव्या कायद्यानुसार निवडलेले पहिले कुलगुरू याच विद्यापीठाला मिळू शकतात.

नव्या विद्यापीठ कायद्याच्या मसुद्याला नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या क्षणी आवाजी मतदानाने मंजुरी मिळाली आहे. आता त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची स्वाक्षरी होण्याची प्रतिक्षा आहे. येत्या काही दिवसांत कोश्यारी यांनी त्यावर सही केली तर ताे कायदा अस्तित्वात येईल आणि त्यानंतर कुलगुरूंची निवड त्या कायद्यातील तरतुदींनुसारच होईल. मात्र, लवकर स्वाक्षरी नाही झाली तर जुन्या कायद्यातील तरतुदीनुसार कुलगुरूंची निवड करण्याचा पूर्ण अधिकार राज्यपालांना असेल. त्यामुळे या विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोण विराजमान होईल, हा निर्णय सर्वस्वी राज्यपालांच्या स्वाक्षरीवर अवलंबून आहे.

कुलगुरू पदासाठी देशभरातून १४५ पेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी देशभरातून १४५पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात विद्यमान प्र-कुलगुरू प्रा. डॉ. बी. व्ही. पवार, डॉ. ए. एम. महाजन यांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार सध्या प्राप्त अर्जांची छाननी सुरू असून ती पूर्ण होऊन अंतीम २५ पात्र उमेदवारांची यादी तयार व्हायला साधारण १५ दिवसांचा अवधी लागेल, असे सांगण्यात येते आहे. त्यानंतर महिन्याभरात कुलगुरू निवड समिती त्या २५ जणांच्या मुलाखती घेऊन त्यातून अंतीम पाच उमेदवार निवडेल. तोपर्यंत नव्या कायद्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली असेल तर ही नावे प्र-कुलपती अर्थात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे जातील. अन्यथा ही पाच नावे थेट राज्यपालांकडे जातील आणि त्यातून एकाची निवड जाहीर केली जाणार आहे.

तर मंत्री घेतील निर्णय
नवा कायदा अस्तित्वात आला तर नव्या कुलगुरूंसाठी पात्र पाच उमेदवारांची नावे समितीला नव्या कायद्यानुसार प्र-कुलपती बनणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे पाठवावी लागतील. त्यातील दोन नावे निवडून ती कुलपतींकडे पाठवली जातील आणि त्यातून कुलपती अर्थात, राज्यपाल एक नाव निवडू शकतील. नवा कायदा अमलात आला नाही तर मात्र अंतीम पाच उमेदवारांची नावे थेट राज्यपालांकडे जातील आणि त्यातून कोणाची निवड करायची ते राज्यपाल ठरवतील.

बातम्या आणखी आहेत...