आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावात खंडग्रास चंद्रग्रहण 25 टक्के दिसणार

जळगाव23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खंडग्रास सूर्यग्रहण २५ ऑक्टोबरला पाहायला मिळाल्यानंतर अाता ८ नोव्हेंबर रोजी जळगावसह महाराष्ट्रात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार आहे. देशात पूर्वाेत्तर भागात सर्वाधिक ९८ टक्के आणि ३ तास ग्रहण पाहावयास मिळेल तर पश्चिम भारतातून केवळ १ तास १५ मिनिटे दिसेल. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यातून दुपारी ५.३० वाजता तर मुंबई येथून ६.०१ वा चंद्रोदयातच ग्रहण सुरू होईल आणि सर्व ठिकाणी सायंकाळी ७.२६ वाजता ग्रहण संपेल. जळगावात २५ टक्के, गडचिरोली येथे ७० टक्के टक्के तर पश्चिम प्रदेशात मुंबई येथे १५ टक्के ग्रहण दिसेल, अशी माहिती खगोल अभ्यासक आणि स्काय वाॅच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.

आठ नोव्हेंबर २०२२ला दिसणारे खंडग्रास चंद्रग्रहण आशिया, ऑस्ट्रेलिया, उत्तर-दक्षिण अमेरिका,येथील काही भागातून दिसेल. पूर्वेत्तर भारताचे टोक असलेल्या अरुणाचल प्रदेशात चंद्र उगवताना खग्रास स्थिती असेल; परंतु चंद्र क्षितिजावर असल्याने पाहता येणार नाही. उर्वरित देशात सर्वत्र हे ग्रहण खंडग्रास दिसेल. भारतीय वेळेनुसार आठ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३२ वाजता छायाकल्प, दुपारी २.३९ वाजता खंडग्रास तर दुपारी ३.४६ वाजता खग्रास चंद्रग्रहणाला सुरवात होईल. दुपारी ५.११ मिनिटाने खग्रास, ६.१९ वाजता खंडग्रास व सायंकाळी ७.२६ वाजता छायाकल्प चंद्रग्रहण समाप्त होईल. ग्रहणाचा छायाकल्प काळ २.१४ तास, खंडग्रास काळ २.१५ तास, खग्रास काळ १.२५ तास तर एकूण ग्रहणाचा काळ ५.५४ तास असेल.

जळगाव, औरंगाबाद व बीड येथे १ तास ३६ मिनिटे दिसणार ग्रहण
हे ग्रहण जळगाव, औरंगाबाद व बीड या तीन जिल्ह्यांत १ तास ३६ मिनिटे दिसणार आहे. दुपारी ५.५० वाजता ग्रहणास सुरुवात होईल. दुपारी ५.५७ वाजता ग्रहण मध्यावर असले. जळगावात हे ग्रहण २५ टक्के दिसणार असल्याचे खगाेल अभ्यासक यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

ग्रहणात अंधश्रद्धा बाळगू नका
ग्रहण हा केवळ उन्ह-सावल्यांचा खेळ असून त्याबद्दल अंधश्रद्धा मानने चुकीचे आणि अवैज्ञानिक आहे. ग्रहणाचा वैज्ञानिक दृष्ट्‍या अभ्यास केला पाहिजे. चंद्रग्रहण पाहण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. पूर्व दिशेला क्षितिज दिसेल अशा मैदानांत किंवा घराच्या सुरक्षित छतावर जाऊन साध्या डोळ्याने किंवा लहान द्विनेत्री दुर्बिणीने ग्रहण पाहावे.

बातम्या आणखी आहेत...