आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायावल तालुक्यातील डांभुर्णी गावातील दादानगरातील गल्लीत असलेल्या घरांसाठी अतिक्रमीत घर तोडून रस्ता मिळण्यासाठी योगेश पाटील या युवकाने गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायत समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागापासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत 33 वेळा अर्ज केले. तीन वर्षांपासून यंत्रणांनी टोलवाटोलवी केली. तुझा रस्त्यासाठी लढा सुरुच ठेव, मात्र आईवडीलांना तुझ्यासोबत बंगरुळुला घेऊन जा, असा सल्ला जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्याने त्याला देऊन हद्दच केली आहे.
मुळचा डांभुर्णी येथील रहिवासी असलेला योगेश पाटील व्यवसायानिमित्त बंगरुळू येथे राहतो. त्याचे वयोवृद्ध आईवडील डांभुर्णी येथे राहतात. या गावातील दादानगरातील गावठाण जागेचे सपाटीकरण करण्यात आलेले आहे. त्याच्या वडिलांच्या घरासह इतर घरे तोडण्यात आली. त्याऐवजी त्यांना एकच जागा देण्यात आली.
या जागेवर युवकाने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घर बांधलेले आहे. तेथील घरांसमोर असलेले एक मोठे घर सपाटीकरण करताना पाडण्यात आले नव्हते. गावच्या आराखड्यानुसार ते घर इतर रहिवाशांच्या रस्त्यावर येत आहे. त्या घराच्या मालकाला दोन घरांची जागाही देण्यात आलेली आहे. अतिक्रमीत घर तोडून तेथील रहिवाशांना रस्ता मोकळा करुन दिलेला नाही. तेथील घरांना रस्ताच नाही.
याबाबत सन 2021 मध्ये योगेशने ग्रा.पं.कडे अर्ज केला. ग्रा.पं.ने समस्या सोडवली नाही. त्यानंतर त्याने तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे अर्ज केला. त्यांनी बिडिओ नेहा भोसले यांना पाठवला. ग्रामविस्तार अधिकाऱ्यांनी पाहणीही केली.नंतर या प्रकरणात काहीच झाले नाही.
अजब सल्ल्यानंतर युवक हतबल
ग्रा.पं.म्हणते ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. तो युवक सार्वजनिक बांधकाम विभागाचे यावलचे उपअभियंत्यांकडे गेला. त्यांच्याकडे रस्त्यांच्या आराखड्याबाबत कोणतेही पुरावे नसल्याचे सांगितले. रस्ता नसल्याने नागरी सुविधा रहिवाशांपर्यंत पोहोचत नाहीत.
युवकाच्या वडिलांच्या घराच्या बांधकाम खर्चात 20 टक्के वाढ झाली. त्याचे पुरावेही त्याच्याकडे आहेत. युवक दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा अर्ज घेऊन गेला होता. त्याला तेथील अधिकाऱ्याने तुझा रस्त्याचा लढा सुरुच ठेव, तोपर्यंत आईवडीलांना तुझ्यासोबत बंगरुळूला घेऊन जा, असा अजब सल्ला दिला. त्यानंतर युवक हतबल झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.