आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फसवणूक:छिंदवाडातील मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचे आमिष देऊन जळगावच्या युवकाची फसवणूक

जळगाव16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर येथील मेहुण्याच्या ओळखीतल्या व्यक्तीने मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील वैद्यकीय महाविद्यालयात अकाउंटंटची नोकरी देण्याचे आमिष देऊन साडेतीन लाख रुपयांनी फसवणूक केली आहे. विशेष म्हणजे त्याला महाविद्यालयही दाखवण्यात आले. तसेच तेथे नोकरीला असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख करून देण्यात आली. त्यानंतर नोकरीचे नियुक्तीपत्रही देण्यात आले. युवकाच्या नातेवाइकाने महाविद्यालयात जाऊन चौकशी केल्यानंतर नियुक्तीपत्रही बनावट असल्याचे आढळून आले. या प्रकरणी मध्य प्रदेशातील दांपत्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवशंकर लखन जवरकर, नीतू शिवशंकर जवरकर (दोन्ही रा. चांदामेटा, वाॅर्ड क्रमांक १०, काली चौकी उमरिया लाइन छिंदवाडा मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दाम्पत्याने नाव आहे. जळगाव शहरातील उमेश चौरसिया या युवकाचा मेव्हणा नागपूर येथे राहतो. त्यांच्या जवरकर हा परिचयाचा होता. सन २०२० मध्ये तो जळगावात एका नातेवाइकाकडे आला होता. त्यावेळी तो उमेशच्या घरी गेला होता. त्यावेळी त्याने छिंदवाडा मेडिकल कॉलेजमध्ये अकाउंटंटची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दिले. कॉलेजमध्ये सेटिंग असून तेथील राजकीय व्यक्तींशी ओळख असल्याचे त्याने उमेशला सांगितले.

त्याला मेडिकल कॉलेजही दाखवून आणलेे. तेथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्याने उमेशची ओळख करून दिली. त्यावेळी तो जळगाव शहरात खासगी नोकरी करीत होता. शासकीय नोकरी मिळत असल्याने तो जवरकरच्या आमिषाला बळी पडला. त्याच वर्षी त्याने १ लाख २५ हजार रुपये नीतू जवरकर यांच्या खात्यात ऑनलाइन पाठविले. प्रत्येक टेबलवर पैसे द्यावे लागतात, असे सांगून जवरकरने त्याच्याकडे अजून पैशांची मागणी केली. त्यानंतर दोन वेळा सव्वादोन लाख रुपये उमेशकडून घेतले.

त्यानंतर त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्तीपत्र दिले. अकाउंटंट म्हणून नोकरी देण्याचे ठरलेले असताना प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे नियुक्तीपत्र दिल्याबाबत त्याने जवरकरला विचारणा केली. सुरुवातील ही नोकरी स्वीकारल्यानंतर अकाउंटंट म्हणून बदली करण्यात येईल, असे त्याने सांगितले. त्यानंतर कोरोना संसर्ग कालावधी असल्याने त्याबाबत पाठपुरावा झाला नाही. मध्यंतरी उमेशचा नातेवाईक महाविद्यालयात जावून आला. त्या नियुक्तीपत्राबाबत चौकशी केली. तसे नियुक्तीपत्रच दिलेले नसल्याचे महाविद्यालयाने सांगितले. त्यानंतर ते नियुक्तीपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

नियुक्तीपत्राबाबत चौकशी केल्यानंतर निघाले बनावट
नियुक्तीपत्र बनावट असल्याचे कळल्यानंतर उमेशला जवरकर याने पदभरतीवर स्थगिती असल्याचे कारण सागून सहा महिन्यांत पैसे देतो, असेही त्याने सांगितले. त्यानंतर उमेशने पाठपुरावा सुरुच ठेवला. जवरकर दाम्पत्याने त्यांचे मोबाइल क्रमांक बदलून टाकले. पैसे देऊन दीड वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही पैसे परत मिळाले नाही. त्यामुळे उमेशने जिल्हापेठ पोलिसांत फिर्याद दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...