आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधूळ व प्रदूषित हवा यांचा शहरवासीयांवर इतका विपरीत परिणाम होतो आहे की, कोरड्या खोकल्याचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्हा रुग्णालयातील खोकल्याचे पातळ औषध दोन दिवसांपूर्वीच संपले आहे. औषधी दुकानांवर खोकल्यावरील पातळ औषधींच्या (सिरप) मागणीत ३५ टक्के वाढ झाली आहे.
शहरात सुरू असलेले रस्त्याचे काम, खड्डे, त्यातून उडणारी धूळ व थंडीमुळे तयार होणारे धुके यामुळे शहरावर प्रदूषित हवेचे पांघरूण पडले आहे. त्याचा परिणाम आरोग्यावर होतो आहे. खासगी दवाखाने आणि शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्णांत ६० टक्के खोकला, ताप अशी तक्रार करणारेच आहेत. नेहमी वापरल्या जाणाऱ्या औषधांनी (अॅण्टिबायोटिक) त्यावर इलाज होत नाही. त्यामुळे कोणते औषध द्यावे, असा प्रश्न डाॅक्टरांना पडतो आहे, असे दोन दिवसांपूर्वीच शहरातील डाॅ. कल्पेश गांधी यांनी म्हटले होते.
मागणी दुप्पट झाली, आठवडाभरापूर्वी केली साठा नाेंदणी जिल्हा शासकीय रुग्णालयातील औषधाची मागणी वाढली आहे. दरवर्षी थंडीच्या दिवसांत या पातळ औषधाच्या साधारण रोज दीडशे बाटल्या रुग्णांना दिल्या जातात. यंदा त्यात दुपटीपर्यंत वाढ झाली. रोज सरासरी पावणेतीनशे बाटल्या रुग्णांना दिल्या जात आहेत. त्यामुळे हे औषधच संपले आहे. डाॅक्टर्स केवळ औषधाच्या गोळ्या देऊन उपचार करीत आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात या औषधाची मागणी नाेंदवली आहे; मात्र, अजून किमान आठवडाभर तरी हे औषध प्राप्त होण्याची शक्यता वाटत नाही, असे सांगण्यात आले. तर खासगी औषधी दुकानांवर खोकल्यासाठीचे पातळ औषध आणि गोळ्यांच्या मागणीतही साधारण ३५ टक्के वाढ झाली आहे, असे जिल्हा केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष सुनील भंगाळे यांनी सांगितले.
डाॅक्टरांनी सांगितला उपाय आहारात डिंकाचे लाडू, तूप, बाजरी, मका, पालेभाज्या, मांसाहार घ्या. राेज कोमट पाणी घ्यावे. थंड पदार्थांचे सेवन टाळावे. धूळ हे खोकल्याचे मुख्य कारण ठरत असल्याने मास्कचा वापर करा. ताप असल्यास तपासणी करा. - डॉ. निखिल पाटील, फिजिशियन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.