आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:जळगावचे मंगेश जुनागडेंचा उपक्रम; फुलविक्रेते अन‌् भाजीपाला विक्रेत्यांची सोय

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानिकारक असून, प्लास्टिकमुक्तीबाबत जळगाव शहरात अभियान राबवण्यात येते आहे. अभियानाला हातभार म्हणून शहरातील मंगेश पुरुषोत्तम जुनागडे यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दररोज आठशे पिशव्या तयार करतात. त्यातून दररोज शहरात लहान व्यावसायिकांना ३०० पिशव्यांचे मोफत वाटप केले जाते. या उपक्रमातून दोन महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

प्लास्टिक पिशव्यांना कागदी पिशव्या हा उत्तम पर्याय आहे. या पिशव्या पाच ते दहा किलोपर्यंत वजन सहज पेलू शकतात. त्यामुळे लोकांनी कागदी पिशव्याच वापराव्यात, असे आवाहन मंगेश जुनागडे आपल्या उपक्रमातून करीत आहे. चार महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. आपल्या घरातील रद्दी विकून न टाकता त्यापासून लहान, मोठ्या आकाराच्या पिशव्या तयार करत आहे. शहरात प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती व्हावी म्हणून दररोज ३०० विक्रेत्यांना या पिशव्यांचे वाटप केले जाते आहे. ज्यांना या पिशव्या आणखी हव्या आहेत ते फोन करून पिशव्या मागवत आहे.

रद्दीचे भाव २२ रुपये किलो, मागणी वाढली
रद्दीचे भाव सध्या २२ रुपये प्रतिकिलो आहेत. एक किलो कागदापासून लहान आकाराच्या ३० तर मोठ्या आकाराच्या २० पिशव्या तयार होतात. लहान ३०० पिशव्यांना साडेसात किलो कागद लागतो. मोठ्या पिशव्यांसाठी मात्र हाच कागद साधारणत: १५ किलो लागतो.

चार महिन्यांमध्ये अडीचशे किलो पिशव्यांची निर्मिती
गेल्या चार महिन्यांपासून हा उपक्रम सुरू आहे. आतापर्यंत अडीचशे किलो कागदापासून पिशव्या तयार करण्यात आल्या आहेत. या पिशव्या शहरातील फुलविक्रेते, मेडिकल स्टोअर, अंडी विक्रेते, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकानदार यांना मोफत स्वरुपात वितरित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...