आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागुजरात राज्यातील एका दुकानदारासह त्याच्या मित्राला औषधी देण्याचा बहाणा दाखवत मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावात बोलावत चाकूसह बंदूक आणि काठ्यांचा धाक दाखवत मारहाण केली. 15 लुटारूंनी दीड लाखांची रोकड, मोबाईल, सोन्याची चैन असा एकूण दोन लाख 59 हजार 599 रुपयांचा ऐवज लांबवला. ही धक्कादायक घटना 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेआठ ते साडेअकरा दरम्यान घडली. तर बुधवारी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दर्शन बिपीनभाई सौलंकी (32, जांगीपूरा, ब्रिजलजवळ, डबोली, सुरत, गुजरात) या तरुणाची फसवणूक झाली आहे. दर्शन हा तरुण दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी गावातील सुरेश चव्हाण याने दर्शन सौलंकी याला औषधी घेण्याचा बहाणा करून मधापुरी गावात बोलावल्याने 1 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता मधापुरी गावात मित्र विशाल उगाभाई गलचर याच्यासोबत आला. दरम्यान, दर्शन हा सुरेशला भेटल्यानंतर त्याच्यासह इतर 10 ते 15जणांनी चेहऱ्यावर रूमाल बांधून बंदुकीसह चाकू व काठ्यांचा धाक दाखवत दर्शनचा मित्र विशाल गलचर याला बेदम मारहाण केली. त्याच्या खिश्यातील दीड लाखांची रोकड काढून घेतली.
ऑनलाईनदेखील रक्कम लांबवली
त्यानंतर भारत प्रवीण पवार यांच्या बँक खात्याशी संलग्न असलेल्या शुभम पाटील यांच्या मोबाईलवर गुगल पे वरून 49 हजार 999 रुपये पाठविले तसेच विशाल गलचरच्या गळ्यातील 15 ग्रॅमची सोन्याची चैन काढून घेतली. एकूण दोन लाख 59 हजार 599 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून घेतल्याप्रकरणी पाच दिवसानंतर दर्शन सौलंकी यांनी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्याने संशयीत सुरेश चव्हाण यांच्यासह दहा ते पंधरा जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर तपास करीत आहेत. या घटनेत दर्शन व विशाल हे दोघे जखमी झाले होते. त्यांनी सुरतला जाऊन उपचार केले. यानंतर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.