आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

24 तासांच्या आत बेड्या:बसस्थानकात प्रवाशाचा मोबाइल हिसकावून पळणाऱ्या झारखंडच्या तरुणास अटक, 8 मोबाइल जप्त

जळगाव3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बसमध्ये चढत असलेल्या प्रवाशाला धक्का मारुन त्याचा मोबाइल हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यास जिल्हापेठ पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली. मोबाइल सुरू असल्यामुळे लोकेशन काढून पोलिसांनी चोरट्याच्या मुसक्या आवळल्या. चोरट्याकडून 8 मोबाइल हस्तगत केले आहेत.

सूरजकुमार राम (वय 19, रा. नयाटोला, ता. महाराजपूर, जि. साहेबगंज, झारखंड) असे चोरट्याचे नाव आहे. घटना अशी की, डोंबिवली येथे राहणाऱ्या रेल्वे कर्मचारी अनिल ठाकूरदार चौधरी (वय 53) हे 22 जून रोजी सकाळी खासगी कामाच्या निमित्ताने जळगावात आले होते. त्यांना भुसावळ येथे जायचे असल्याने बसस्थानकातून एका बसमध्ये ते चढत होते. यावेळी मागून आलेल्या या तरुणाने चौधरी यांना धक्का देऊन त्यांच्या शर्टच्या खिशात ठेवलेला मोबाइल काढून पळ काढला. चौधरींनी आरडाओरड केली परंतु चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला.

पोलिस ठाण्यात तक्रार

चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात धाव घेेत तक्रार केली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख, गणेश पाटील, जुबेर तडवी, अमित मराठे, विनोद पाटील यांच्या पथकाने बसस्थानक परिसरात गस्त केली. चौधरी यांचा मोबाइल दिवसभर सुरुच होता. त्यामुळे पोलिसांनी लोकेशन काढले. सायंकाळच्या वेळी पुन्हा मोबाइलचे लोकेशन बसस्थानक परिसर दिसून आले.

पथकाने ठोकल्या बेड्या

पथकाने चौधरी यांना सोबत घेत बसस्थानकात गस्त केली. यावेळी सूरजकुमार संशयितपणे फिरताना दिसला. पथकाने ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे आठ मोबाइल सापडले. यातील एक मोबाइल चौधरी यांचा हाेता. तर उर्वरित सात मोबाइल त्याने शहरातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या हातातून हिसकावल्याची कबुली दिली. पोलिस संबधित मोबाइल धारकांचा शोध घेत आहेत. या प्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरुन गुरुवारी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र पवार तपास करीत आहेत. सूरजकुमार याला न्यायालयात हजर केले असता त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...