आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराथॅलेसिमियाग्रस्त चिमुकल्यांची ४० चित्र प्रदर्शित झाली आहेत. ती कला संजीवनी चित्रप्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. भाऊंच्या उद्यानातील वानखेडे कला दालनात १० जूनपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. केशव स्मृती प्रतिष्ठानचे सहकार्य लाभत आहे, असे डॉ. सई नेमाडे यांनी सांगितले.
कोसला फाउंडेशनने हे प्रदर्शन आयोजित केले आहे. जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ. राधेश्याम चौधरी, डाएटचे माजी प्राचार्य नीळकंठ गायकवाड, चोपडा येथील कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजेंद्र महाजन उपस्थित होते. सकारात्मक ऊर्जा देणारा हा उपक्रम आहे. थॅलेसेमिया रुग्णांवर कोसला फाउंडेशनच्या माध्यमातून उपचार उपलब्ध करून देणाऱ्या डॉ. सई नेमाडे यांच्यासोबत आपण सर्वांनी या आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या कामात लक्ष घातले पाहिजे. पंधरा वर्षापूर्वी एका थॅलेसेमियाग्रस्त व्यक्तीसाठी सर्वांनी मिळून काही एकत्रितपणे प्रयत्न केल्याची आठवण अशोक जैन यांनी सांगितली. डॉ.राधेश्याम चौधरी यांनी आणि प्राचार्य नीळकंठ गायकवाड यांनीही कलेतून विद्यार्थी कसे अभिव्यक्त होतात याविषयी काही दृष्टांत-दाखले देऊन मार्गदर्शन केले. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी डॉ. सई नेमाडे यांच्या परिश्रमाविषयी आदर व्यक्त केला.
फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक
राजू बाविस्कर, जितेंद्र सुरळकर, सचिन मुसळे, विजय जैन या कलावंतांच्या हस्ते प्रदर्शनात सहभागी विद्यार्थ्यांचा गिफ्ट देऊन स्नेहपूर्वक गौरव करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मान्यवरांना तुळशीचे रोप भेट देण्यात आले. प्रास्ताविक डॉ. सई नेमाडे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. कोसला फाउंडेशनच्या कामाची मान्यवरांनी प्रशंसा केली.
कलेमुळे सकारात्मकता वाढते
भारतात आणि परदेशात विज्ञानाने सिद्ध केले आहे की संगीत आणि कला यामुळे सकारात्मकता वाढते. त्याचा चांगला परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. विशेषतः ज्या आजारांवर औषधे घेत असतो त्याचा परिणामदेखील अधिक चांगल्या पद्धतीने होतो. युरोप येथील एका चित्र स्पर्धेसाठी या प्रदर्शनातील चित्र पाठवली जाणार असल्याची माहिती डॉ. सई नेमाडे यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.