आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Jalgaon
  • Keep The Waterfall Closed But Open The Temple Of Patna Devi; Tourists Are Banned From Going To 'Dhawal Tirtha' Due To The Order Of The District Collector| Marathi News

दिव्य मराठी विशेष:धबधबा बंद ठेवा पण पाटणादेवीचे मंदिर खुले करा; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे ‘धवल तीर्थ’वर जाण्यास पर्यटकांना आहे बंदी

जळगाव5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ व खान्देशची कुलस्वामिनी म्हणून ओळख असलेल्या पाटणादेवी (चंडिकादेवी) मंदिर तसेच धवल तीर्थ धबधबा तसेच केदार कुंड या परिसरात १० ऑगस्टपर्यंत भाविकांसह पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे; मात्र पाटणा ग्रामस्थांनी या निर्णयाला विरोध करून धवल तीर्थ धबधबा व केदार कुंड परिसर बंद ठेवा, मात्र पाटणादेवी मंदिर भाविकांसाठी खुले करा, अशी मागणी केली आहे. याबाबत बुधवारी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी तहसीलदार अमोल मोरे यांना पत्र दिले.

जिल्हाधिकारी यांनी २१ जुलैला पाटणादेवी अभयारण्यातील केदार कुंड व धवल तीर्थ धबधबा येथे जाण्यास पर्यटकांना बंदी केली आहे. हा आदेश ग्रामस्थांना मान्य आहे. मात्र, या परिसरात चंडिका मातेचे पुरातन मंदिर असून मातेच्या दर्शनासाठी देशातून भाविक येतात; परंतु चंडिका माता मंदिर अभयारण्यात येत असल्याने तेथे अनेक जाचक बंधने भाविकांवर घातले जातात. जिल्हा प्रशासनाने प्रवेश बंदी केलेले धवल तीर्थ हे मंदिरापासून दीड तर केदार कुंड हे अडीच किमी अंतरावर आहे. त्यामुळे मंदिर परिसरात कुठल्याही प्रकारच्या आपत्ती व्यवस्थापनाचा धोका नाही.

अद्यापही पूल नाही : मंदिराबाहेर डोंगरी नदीवरील लोखंडी पुलाचा मोबदला पुरातत्त्व विभागाने कंत्राटदाराला न दिल्याने हा लोखंडी पूल जून महिन्यात काढून घेतला आहे. पूल नसल्याने मंदिरात जाणाऱ्या भाविकांना व पर्यटकांना दर्शनासाठी जीव धोक्यात घालून नदीच्या पाण्यातून जावे लागते. आमदार मंगेश चव्हाण यांनी या नदीवर तत्काळ पूल उभारण्याबाबत आदेश केले हाेते. या नंतरही पूल उभारलेला नाही. त्यामुळे पुरातत्त्व विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

भाविक नाराज हाेऊन परत
अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार बंद असल्याने भाविकांना मंदिर परिसरात जाता येत नाही. परिणामी बाहेरून आलेले भाविक पाटणादेवीचे दर्शन न झाल्याने ते नाराज हाेऊन परततात. भाविक पाटणा येथील ग्रामस्थांना मंदिर प्रवेशबंदी का केली आहे, असे विचारतात. मात्र, भाविकांच्या प्रश्नाला ग्रामस्थ उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे भाविकांना अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार खुले करून मंदिर दर्शनासाठी जाऊ द्यावे, अशी विनंती पाटणा ग्रामपंचायतीने एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर सरपंच नितीन चौधरी, महेंद्र निकम यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...