आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाडेचार वर्षांपूर्वी झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा माहाेल अन् आताचे वातावरण यात कमालीची तफावत जाणवू लागली आहे. तापमान वाढीमुळे उन्हाचे चटके वाढले असले तरी राज्य निवडणूक आयाेगाकडून काेणतेही आदेश नसल्याने राजकीय वातावरण मात्र अजून थंडच आहे. गेल्या वेळी फेब्रुवारी महिन्यातच प्रभाग रचना सादर करण्याचे आदेश झाल्याने राजकीय धुळवळीने रंग भरायला सुरुवात झाली हाेती. ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाने निर्णय न दिल्यामुळे दाेन वर्षांपासून राज्यातील मनपाच्या निवडणुका लांबल्या आहेत. आैरंगाबादसह सर्वच मुदत संपलेल्या मनपामध्ये प्रशासकामार्फत कामकाज सुरू आहे. त्यामुळे लाेकप्रतिनिधी निवडणूक जाहीर हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत. जळगाव महापालिकेतही त्याचेच संकेत मिळू लागले आहेत.
प्रभाग रचना कायम राहण्याचे संकेत
यंदा निवडणूक अवघ्या पाच महिन्यांवर येऊन ठेपली आहे; परंतु राज्य निवडणूक आयाेगाकडून काेणतेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. मनपाच्या निवडणूक विभागाला प्रभाग रचना अथवा अन्य बाबी तयार करण्याच्या सूचना नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे इतर महापालिकांप्रमाणेच जळगाव महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडणार की काय? असा प्रश्न या निमित्ताने नगरसेवक उपस्थित करू लागले आहेत. शासनाने चार सदस्यीय प्रभाग पद्धती कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जळगाव महापालिकेला फार काही बदल करावे लागण्याची शक्यता कमीच असल्याचेही सांगितले जात आहे.
साडेचार वर्षांपूर्वी या हाेत्या जळगावात हालचाली
२०१८मध्ये झालेल्या जळगाव मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयाेगाने १२ जानेवारी २०१८ राेजी आदेश काढत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गाेडावून अद्ययावत ठेवण्याच्या सूचना दिल्या हाेत्या. १७ व १८ जानेवारी २०१८ राेजी राज्य निवडणूक आयाेगाच्या तीन महिला अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली हाेती. त्यानंतर १७ फेब्रुवारी २०१८ राेजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली हाेती. २८ फेब्रुवारी २०१८ राेजी प्रारूप प्रभाग रचना तयार करून सादर करण्याचे आदेश दिले हाेते.
४ एप्रिल २०१८ राेजी निघाले हाेते आरक्षण साेडत
मागच्या निवडणुकीत साडेचार वर्षांपूर्वी मार्च महिन्यापासून राजकीय जुगलबंदीला सुरुवात झाली हाेती. मार्च २०१८ हा खऱ्या अर्थाने इच्छुकांसाठी राजकीय करिअर निश्चितीचा काळ ठरला. १५ मार्च २०१८ राेजी राज्य निवडणूक आयाेगाकडे प्रारूप प्रभाग रचना सादर करण्यात आली हाेती. त्यानंतर ३१ मार्च राेजी साेडत काढण्यासाठी जाहीर नाेटीस प्रसिद्ध करण्यात आली हाेती. तर ४ एप्रिल राेजी आरक्षण साेडत व प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. यंदा मात्र चित्र उलटे आहे.
२७ बंडखाेर नगरसेवकांना सतावतेय भवितव्याची चिंता
मनपा निवडणुकीसाठी वारे थंड असले तरी भाजपतून फुटलेल्या २७ बंडखाेरांच्या भवितव्याचे वारे मात्र गरम आहेत. दिल्ली येथे ८ राेजी सुनावणी हाेऊन १४ राेजी अंतिम युक्तिवाद व निर्णय लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर विभागीय आयुक्त आपला निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. जर २७ नगरसेवकांना सहा वर्षांसाठी अपात्र करण्यात आले तर त्यांना पुढील दाेन निवडणुका लढता येणार नाही अशीही जाेरदार चर्चा सुरू झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.