आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासक्रम सुरू:विद्यापीठात शिका जर्मन, जपानी भाषा; कुलगुरू म्हणतात, विद्यार्थ्यांत अतिरिक्त काैशल्य विकसित हाेणार

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत असताना व्यक्तिमत्त्व विकासासाठी इतर कौशल्यांची गरज असून, विद्यापीठाने सुरू केलेल्या जर्मन आणि जपानी भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिरिक्त कौशल्य निर्माण होतील, असा विश्वास कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी व्यक्त केला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या बहि:स्थ शिक्षण आणि अध्ययन विभागातर्फे जर्मन आणि जपानी भाषा प्रमाणपत्र शिक्षणक्रमाचे उद‌्घाटन ऑनलाइन कुलगुरूंच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी कुलगुरू प्रा. माहेश्वरी म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्टस्किल अत्यावश्यक आहेत. बहि:स्थ विभागातर्फे ती गरज लक्षात घेऊन या भाषांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू झाले आहे. याशिवाय जे नियमित शिक्षणासाठी येऊ शकत नाही. त्यांच्यासाठी देखील या विभागातर्फे विविध अभ्यासक्रम सुरू आहेत. महाराष्ट्रासह बाहेरील विद्यार्थ्यांनी या दोन परकीय भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेतल्याबद्दल कुलगुरूंनी आनंद व्यक्त केला. त्यानंतर जपानी भाषा शिकवणाऱ्या माया नरसापूर यांनी मनोगत व्यक्त केले. त्यात त्यांनी अनेक दाखले देऊन लक्ष वेधून घेतले. इंग्रजी भाषेची भीती बाळगू नका. भाषा काेणतीही असू द्या. तिचा अभ्यास केला म्हणजे ती अधिक साेपी हाेते असेही त्या या वेळी आवर्जून म्हणाल्या.

जर्मन भाषा शिकवणाऱ्या श्रेया पाठक यांनी परदेशात भारतीय संस्कृतीविषयी आदराची भावना असल्याचे सांगून भारतीयांनी अन्य संस्कृतीचा मान ठेवावा तसेच व्यक्तिमत्त्व विकासासाठी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन केले. बहि:स्थ शिक्षण अध्ययन विभागाचे प्रभारी संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी प्रास्ताविकात या शिक्षणक्रमाची माहिती दिली. डॉ. मनीषा जगताप यांनी सूत्रसंचालन केले. ऑनलाइन शिक्षणक्रमासाठी ५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, जळगाव, धुळे व नंदुरबार व्यतिरिक्त मुंबई, पुणे, नाशिक, रायगड व मध्य प्रदेशातील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...