आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भगवान नगरच्या ज्येष्ठ नागरिकाने घरात साकारले ग्रंथालय,1600 पुस्तकांचा संग्रह वाचनासाठी खुला

जळगाव2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र वाचनातून ज्येष्ठांना मिळतोय विरंगुळा

कथा, कादंबऱ्या, चरित्रग्रंथासह महाभारत, रामायणकालीन जुनी पुस्तके जमवण्याचा छंद शहरातील भगवान नगरातील लीलाधर सोनवणे यांनी वयाच्या सत्तराव्या वर्षीही कायम ठेवला आहे. ग्रंथदालन, साहित्य संमेलनातून पुस्तके खरेदी करून ती केवळ आपल्यापुरता मर्यादित न ठेवता वाचकांना पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. विविध प्रकारातील १६०० पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे.

जमा केलेली ही पुस्तके पूर्णपणे वाचून त्यातील काही संदर्भ, टिपणे काढण्याची सवय सोनवणे यांना आहे. कॉटन फेडरेशनमधून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी या छंदाला अधिक वेळ दिला. कथा, कादंबरी, चरित्रग्रंथासह रामायण, महाभारताची अनेक पुस्तके त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. घरातील तीन कपाटे या पुस्तकांनी भरली आहेत. शंभरापेक्षा अधिक कादंबऱ्यांचे वाचन केले आहे. नामांकित लेखकांची पुस्तके जुनी अथवा नवी जी असतील ती वेळप्रसंगी जादा किंमत देऊन ते संग्रह करतात. १९७२ मध्ये प्रकाशित झालेल्या १९ कादंबऱ्या त्यांनी नुकत्याच खरेदी केल्या आहेत.

सहकाऱ्यांना लागला लळा : सोनवणे यांनी त्यांच्याकडे जो पुस्तकांचा संग्रह आहे तो परिसरातील नागरिकांसाठी खुला केला आहे. ज्यांना खरोखर आवड आहे त्यांना ते पुस्तक परत आणून देण्याच्या जबाबदारीवर देतात. प्रत्येकाने जे पुस्तक वाचले त्याच्यावर चर्चा करावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. अर्थात, या माध्यमातून वाचनाचा लळा परिसरातील सहकाऱ्यांना लागला.

साहित्य संमेलनात दरवर्षी १० हजारांची खरेदी
दररोज पुस्तकाचे २० ते २५ पाने वाचल्याशिवाय झोप लागत नसल्याचे सोनवणे नेहमी सांगतात. दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास हजेरी लावत तेथून आठ ते दहा हजारांची २०० ते २५० पुस्तकांची खरेदी करतात. नियमित वाचन केल्याने ज्ञानात भर पडते असे सोनवणे हे ग्रंथविषयक गप्पा करताना सांगतात.

बातम्या आणखी आहेत...