आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराखरीप हंगाम तोंडावर असतांना बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करण्यात यावा, त्यांच्यावर कठोर कारवाई करून धडा शिकवा, असे निर्देश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तसेच पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागणाऱ्या बॅकांवर कारवाई होणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. अजिंठा विश्रामगृहात आयोजित जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीत पालकमंत्री हे बोलत होते. या वेळी आमदार एकनाथ खडसे, चिमणराव पाटील, संजय सावकारे, जिल्हाधिकारी अमन मित्तल व इतर अधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या बियाणे, खतांचे पक्के बिल विक्रेत्याकडून घ्यावे. जिल्हा व तालुकास्तरावर भरारी पथकांची स्थापना करण्यात बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्यांना व खतांचा कृत्रीम टंचाई करणाऱ्यांना कृषी अधिकाऱ्यांनी धडा शिकवण्यासाठी कठोरात कठोर कारवाई करावी. बियाणे व खते बाबत शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन तक्रार घेण्यासाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्याचा निधी वितरित होत आहे. उर्वरित दोन टप्प्यातील निधीही तत्काळ वितरित करण्यात येईल. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाने वेळोवेळी तातडीने मदत जाहीर केली आहे. मार्चमध्ये झालेल्या अवकाळीचा आपल्या जळगाव जिल्ह्यातील १८ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या शेतकऱ्यांना तातडीने २० कोटी ४२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे.यावेळी तालुका स्तरावर शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात याव्यात असे चिमणराव पाटील व एकनाथ खडसे यांनी सूचित केले. या वेळी विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅकांकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप नाही
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत ७२८ कोटी ९४ लक्ष पिक कर्ज वाटप उदिष्टपैकी ४८ टक्के म्हणजे ३४८ कोटी ८६ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप केले आहे. राष्ट्रीयकृत बॅकांनी पीक कर्ज वाटप केलेले नाही. या बॅकांनी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्याचे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.
शेतीसाठी अखंडित वीज पुरवठा द्या
अधिकाऱ्यांनी तालुका पातळीवर आवश्यक त्या ठिकाणी नवीन हवामान यंत्र अपडेट करून मनेरगा किंवा इतर शासनाच्या योजनामधून शेतकऱ्यांना सर्व शासकीय योजनाची माहिती पोहचून लाभ देण्याबाबत तत्पर राहा. लोडशेडिंग बंद असून महावितरणाने शेतीसाठी अखंड वीज पुरवठा करण्याबाबत दक्ष राहावे. पर्जन्यमानाची अनिश्चितता लक्षात घेता जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.