आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमळनेर येथील प्रसिद्ध संत सखाराम महाराजांची पायी वारी गुरुवारी पारोळा तालुक्यातील आडगाव येथे पोहोचली. या वारीचे प्रस्थान शुक्रवारी सकाळी 9 वाजता आडगावहुन होऊन सायंकाळी भडगाव येथे पोहोचणार आहे. वारीसोबत प्रसाद महाराज गेल्या 33 वर्षांपासून उपस्थित आहेत. कोरोना काळात र्निबंधांमुळे वारकऱ्यांना पंढरपुरची वारी काढण्याची परवानगी नसल्यामुळे 2 वर्षांच्या खंडानंतर यंदा उत्साहात अनेक दिंड्या निघाल्या आहेत.
बुधवारी अमळनेर येथुन सुरुवात झालेली ही दिंडी टाळ, मृदंगाचा साथसंगतीने विठ्ठलननामाचा जयघोष करीत पारोळ्यातील लाडशाखीय वाणी समाज मंगलकार्यालयात पाहोचली होती. गुरुवारी दुपारी 2.30 वाजता पारोळ्याहुन आडगावी मुक्कामी आली. वाटेत दोन-तीन ठिकाणी भक्तांनी वारकऱ्यांचे स्वागत करुन दर्शन घेतले. यावेळी अभय महाराजही उपस्थित होते.
सायंकाळी आडगाव येथे दिंडी पोहोचल्यानंतर नियमित हरीपाठ झाला. रात्रीच्यावेळी भजन, किर्तनाने संपुर्ण गावात भक्तीचे वातावरण तयार झाले होते. रात्री उशिरा प्रसाद महाराजही काही वारकऱ्यांसह आडगाव येथे पोहोचले. फटाक्यांची आतषबाजी करुन सेवेकऱ्यांनी महाराजांचे स्वागत केलेे. 7 वर्षांच्या बालकापासून ते 70 वर्षांपर्यंतच्या वृद्धाचा या दिंडीत सहभाग आहे.
गावातील सेवेकऱ्यांची सेवा अनोखी
सुमारे 800 लोकसंख्या असलेेले आडगाव हे छोटेसे गाव आहे. अनेक वर्षांपासून या गावात अमळनेरच्या मानाच्या दिंडीचे स्वागत, सेवा केली जाते. मसाल्याची भाजी, भात, गाेड पदार्थ असे रुचकर जेवण गावकरी करुन ठेवतात. रात्री उशिरापर्यंत गावात भजन, किर्तनासह वारकऱ्यांचा प्रवास सुरुच होता. झोपण्यासाठी मंदिर, शाळेसह गावातील अनेक लोक स्वत:च्या घरांमध्येही व्यवस्था करतात. विशेष म्हणजे महिला वारकऱ्यांसाठी घरांमध्ये व्यवस्था केली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.