आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावारकरी संप्रदायाचे प्रणेते जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या नावाने शहरातील मध्यवर्ती भागातील खुल्या जागेत भव्य मंगल कार्यालयासह वसतिगृहाची उभारणी केली जाणार आहे. त्यासाठी काथार वाणी समाज मंडळाने तयारी सुरू केली आहे. गुरुवारी तुकाराम बीज महोत्सवानिमित्त होणाऱ्या सोहळ्यात याबाबत शिक्कामोर्तब केला जाणार असल्याची माहिती काथार कंठहार वाणी समाज सेवा संघाचे अध्यक्ष अजय कामळस्कर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. दरम्यान, सोहळ्यानिमित्त गुरुवारी भव्य शोभायात्रेसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रिंगरोडवरील महापालिकेच्या सुमारे १० हजार स्क्वेअरफूट खुल्या जागेत भव्य मंगल कार्यालयासह वसतिगृह उभारण्याचे नियोजन आहे. महापालिकेने समाजाच्या पदाधिकाऱ्यांना ही जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या २० वर्षांपूर्वी या ठिकाणी भूमिपूजन होऊन कोनशिलेचे अनावरणही झाले आहे. या जागेला आता ऊर्जितावस्था देत महापालिकेकडून अंतिम परवानगी प्राप्त करून घेत, मंगल कार्यालयाच्या बांधकामास सुरुवात केली जाणार आहे. यासाठीची रचना, आराखडाही तयार करण्यात आला आहे. संत तुकाराम महाराजांच्या नावाने शहरात एकही शासकीय वास्तू नसून कुठल्याही जागेस त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. याविषयी महापालिकेसह प्रशासनाकडे अनेकदा मागणीही केली आहे. त्यामुळे समाजबांधवांनी या जागेवर मंगल कार्यालय उभारणीचा संकल्प करीत कामास सुरुवात केली आहे.
शहरात आज भव्य मिरवणूक, चित्ररथ
तुकाराम बीज महोत्सवानिमित्त गुरुवारी सकाळी ८.३० वाजता नागो गणू वाणी मंगल कार्यालयात प्रतिमा पूजन होईल. यासह दुपारी ४ वाजता संत तुकाराम यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यात टाळकरी, भजनी मंडळ, बॅण्ड पथक, लेझीम पथक, संत तुकाराम महाराजांचा आकर्षक असा चित्ररथ असणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्ष नेते सुनील महाजन उपस्थित राहणार आहेत.
प्रशस्त सांस्कृतिक सभागृहाचेही नियोजन
रिंगराेडवरील जागेवर मंगल कार्यालय, सांस्कृतिक सभागृह, बाहेरगावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाचीही उभारणी केली जाणार आहे. यासाठी सुमारे एक कोटीपर्यंतचा निधी हा समाजबांधवांमधून देणगी रूपातून उभारला जाणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. याकार्यास गती देण्यासाठी गुरुवारी होणाऱ्या बीज महोत्सवात समाजबांधवांच्या संमतीने निधी उभारण्यास सुरुवात केली जाणार आहे. या कार्यासाठी विजय वाणी, सतीश वाणी, वासुदेव वाणी, मुकुंदा वाणी, अरविंद वाणी, पुरुषोत्तम वाणी, भूषण हरणे, भालचंद्र वाणी यांनी पुढाकार घेतला असून ते नियोजन करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.