आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिक मुक्त अभियानाला हातभार:जळगावचे मंगेश जुनागडे दररोज 300 विक्रेत्यांना करतात कागदी पिशव्यांचे मोफत वितरण

जळगाव17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्लास्टिकच्या पिशव्या पर्यावरणासाठी प्रचंड हानीकारक असून प्लास्टिक मुक्तीबाबत जळगाव शहरात अभियान राबवण्यात येत असतानाच शहरातील मंगेश पुरुषोत्तम जुनागडे यांनी कागदी पिशव्या तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. दररोज आठशे पिशव्या तयार करुन त्या शहरात लहान व्यावसायिकांना मोफत वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमातून ते प्लास्टिक मुक्ती अभियानाला हातभार लावण्याचे काम करत आहे. दरम्यान या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगार देखील उपलब्ध करून दिला आहे.

प्लास्टिकच्या पिशव्यांना कागदी पिशव्या हा उत्तम पर्याय आहे. अगदी सहज विना खर्चिक असे काम असून ऑनलाईन कागदी पिशव्या तयार करण्याचे धडे गिरवले होते. या पिशव्या दहा किलोपर्यंत वजन सहज पेलू शकतात. त्यामुळे लोकांनी कागदी पिशव्याच वापराव्यात, असे आवाहन मंगेश जुनागडे आपल्या उपक्रमातून देत आहे. चार महिन्यांपासून त्यांनी हा उपक्रम राबविण्यास सुरवात केली असून आपल्या घरातील रद्दी विकून न टाकता त्यापासून लहान, मोठ्या आकाराच्या पिशव्या तयार करत आहे.

महिलांना मिळाला रोजगार

जळगावकरांमध्ये प्लास्टिकमुक्तीबाबत जनजागृती व्हावी याकरिता दररोज तीनशे विक्रेत्यांना या पिशव्यांचे वाटप केले जात आहे. ज्यांना या पिशव्या आणखी हव्या आहेत. ते फोन करून आणखी पिशव्या मागवत आहे. दरम्यान दोन महिलांना या पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले असून त्या आठशे पिशव्या एका दिवसाला तयार करतात. याकरिता त्यांना पैसे देखील दिले जातात. घरबसल्या काम असून या उपक्रमामुळे महिलांना रोजगार देखील प्राप्त झाला आहे.

4 महिन्यात अडीचशे किलो पिशव्यांची निर्मिती

गेल्या चार महिन्यापासून हा उपक्रम सुरु असून आतापर्यंत अडीचशे किलो कागदापासून पिशव्या तयार करण्यात आल्या आहे. सदर पिशव्या या फुल विक्रेते, मेडिकल स्टोअर, अंडी विक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच किराणा दुकानदार यांना वितरित करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...