आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेल्या वर्षीच्या तुलनेत 28.6 मि.मी. पाऊस कमी:पेरणी 2 टक्क्यांनीच घटली; जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 13 टक्केच क्षेत्रावर पेरणी

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 22 जून उजाडला तरी पावसाने ओढच दिलेली आहे. आतापर्यंत सरासरीपैकी केवळ 13 टक्केच क्षेत्रावर पेरणी करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या दिवसापर्यंत 28.6 टक्के कमी पाऊस पडला. असे असले तरी पेरणी मात्र केवळ 2 टक्क्यांनीच घटली आहे.

जिल्ह्याचे सरासरी वार्षिक पर्जन्यमान 719.70 मि.मी.इतके आहे. जिल्ह्यात या आठवड्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस झालेला आहे. पेरणीयोग्य पुरेसा पाऊस झालेला नसून तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुरेशा पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. शेतकऱ्यांनी खते,बियाण्यांची उपलब्धता करुन ठेवलेली आहे. प्रतिक्षा केवळ पावसाची आहे.पाऊस लांबत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर पेरणी......

सन 2021 मध्ये 21 जूनपर्यंत जिल्ह्यात 63 मि.मी.पावसाची नोंद झाली होती. सरासरीच्या केवळ 15 टक्केच क्षेत्रावर पेरणी झालेली होती. जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान 123.7 मि.मी.इतके आहे. आतापर्यंत केवळ 34.4 मि.मी.पावसाची नोंद झाली. पावसाचे केवळ चार दिवस राहिले. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 28.6 मि.मी.पाऊस कमी झाला.तरीही पेरणी क्षेत्र केवळ दोन टक्क्यांनी घटले आहे.

97 हजार हेक्टरवर कपाशीची लागवड

जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र 5 लाख 57 हजार 516 हेक्टर आहे. शेतकऱ्यांनी धूळपेरणी तसेच ठिबकवर कपाशीची लागवड केली आहे. आतापर्यंत 97 हजार 493 हेक्टरवर कपाशीची लागवड करण्यात आली. कपाशीच्या सरासरी लागवड क्षेत्राच्या 20 टक्के लागवड झाली. तृणधान्याची 1832 हेक्टरवर पेरणी झाली. एकूण 99 हजार 325 हेक्टरवर पेरणी झाली.सरासरीच्या 13 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली.

तालुकानिहाय पेरणीची टक्केवारी

जळगाव 15, भुसावळ 12, बोदवड 12, यावल 4, रावेर 25, मुक्ताईनगर 14, अमळनेर 20, चोपडा 10, एरंडोल 30, धरणगाव 11, पारोळा 21, चाळीसगाव 7, जामनेर 9, पाचोरा 9, भडगाव 10.

10 जुलैपर्यंत पेरणी शक्य

जिल्ह्यात पावसाने ओढ दिलेली असल्याने चिंता वाढत चालली आहे. खरीप हंगाम सुरुच आहे. गेल्या वर्षीही जूनच्या शेवटच्या आठवड्यानंतर पेरणीला सुरुवात झाली होती. 10 जुलैपर्यंत कापूस,कडधान्यासह सर्व पिकांची पेरणी करता येते. मुबलक प्रमाणात खते व बियाण्यांची उपलब्धता आहे. प्रतिक्षा केवळ पावसाची आहे. पुरेसा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी.-अनिल भोकरे, कृषी उपसंचालक