आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक:जळगावात अपघातांची मालिका, ट्रॅक्टरवर कार धडकली, चालकासह महिलेचा मृत्यू

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजारी असलेल्या जावयाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी भादली येथून निघालेला दांपत्याची कार कानळदा रस्त्यावरील केसी पार्कजवळ लाकडाने भरलेल्या ट्रॅक्टरवर आदळली. त्यात कारमधील महिला व कारचालक ठार झाले. तर महिलेच्या पतीसह ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाले. गुरुवारी सकाळी ६.३० वाजता हा अपघात घडला.

लताबाई विजय उर्फ रामकृष्ण सपकाळे (वय ५०) व संदीप अरुण सोनवणे (वय ३७, दोघे रा. भादली, ता. जळगाव) हे दोघे मृत झाले. तर लताबाईंचे पती रामकृष्ण सदाशिव सपकाळे (वय ५७, रा. भादली, ता. जळगाव) व ट्रॅक्टरचालक बापू केशव सपकाळे (वय ४५, रा. कानळदा) हे दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना अशी की, सपकाळे दांपत्याच्या मुलीचे सासर तालुक्यातील भोकर हे आहे. जावयाची प्रकृती खराब असल्याने सपकाळे दांपत्य त्यांना सेंधवा येथे उपचारासाठी घेऊन जाणार होते. त्यासाठी गुरुवारी सकाळी ६ वाजता सपकाळे दांपत्याने पुतण्याची कार (एमएच १४ एफसी ४५५०) घेतली.

कार चालवण्यासाठी गावातच राहणाऱ्या संदीप सोनवणेला सोबत घेतले. हे तिघे जण सुरुवातीला भोकर येथे जाणार होते. तेथून जावयास घेऊन सेंधवा जाण्याचे त्यांचे नियोजन होते. तत्पूर्वी सकाळी ६.३० वाजता कानळदा रस्त्यावरील केसी पार्कजवळ शेतातून मुख्य रस्त्यावर येत असलेल्या ट्रॅक्टरवर कार धडकली. या भीषण अपघातात कार व ट्रॅक्टरचे धूड चक्काचूर झाले. कारचालक संदीप व मागे बसलेल्या लताबाई जागीच ठार झाल्या. तर त्यांचे पती रामकृष्ण व ट्रॅक्टरचालक बापू सपकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, रतन गिते यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवले. यानंतर अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला घेऊन वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती मिळताच भादली गावातील लोकांनी रुग्णालयात गर्दी करीत दु:ख व्यक्त केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मृत लताबाई यांच्या पश्चात पती, एक मुलगा, सून, दोन नाती, मुलगी व जावई असा परिवार आहे. तर मृत संदीपच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

अपघात सत्राने शहर हादरले
सिव्हिलच्या अधिपरिचारिका प्रेरणा अमोल सपकाळे यांना बुधवारी तरसाेद फाट्याजवळ डंपरने चिरडले. त्यामुळे त्यांच्या चारवर्षीय मुलाच्या डोक्यावरून आईचे छत्र हरपले. त्यानंतर गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात लताबाई सपकाळे व संदीप साेनवणे यांचा मृत्यू झाला. सलगच्या अपघातांनी शहर हादरले.

एकेरी वाहतुकीने झाली अडचण
कार व ट्रॅक्टरचा अपघात जेथे झाला तेथे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. अर्थात, एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे एकाच बाजूने वाहने ये-जा करतात. परिणामी समाेरून वाहन येताना दिसले म्हणजे वाहनचालकांचा गाेंधळ उडताे. शेतातून लाकडांनी भरलेले ट्रॅक्टर अचानक समाेरून आले. ते कारचालकाला लवकर दिसले नाही. म्हणून हा अपघात घडला.

बातम्या आणखी आहेत...