आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशभरात विविध संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय संपात वीज कर्मचारीही सहभागी झाले आहेत. या संपामुळे शहरातील मेहरूण फीडरवर कर्मचारी न आल्याने तब्बल चार तासांपेक्षा अधिक वेळ वीजपुरवठा खंडित राहिला. १३२ केव्हीवरील जंप तुटल्याने मेहरूणसह आदर्शनगर, महाबळ फीडरवरील वीजपुरवठा खंडित झाला. संपात सहभागी नसलेल्या नाममात्र कर्मचाऱ्यांसह कंत्राटी आऊटसोर्सिंगच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ हजर होत वीजपुरवठा सुरळीत केला. या भागासह शहरातील अन्य काही भागांमध्येही दुपारी वीज बंद झाल्याने नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.
ऊर्जा सचिव आणि तिन्ही वीज कंपन्या प्रशासनासोबत वाटाघाटीत सामंजस्य करार न झाल्याने दीड लाखावर बाह्यस्रोत वीज कामगार, कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांनी रविवारी मध्यरात्रीपासून संप पुकारला. मेहरूण फीडरवरील वीजपुरवठा सकाळी साडेसहा वाजता खंडित झाला; मात्र तो सुरळीत करण्यासाठी कर्मचारीच नसल्याने परिसरातील नागरिक वीजपुरवठा सुरू होण्याच्या प्रतीक्षेत होते. चार तासांनंतरही वीजपुरवठा सुरू होत नसल्याने नागरिकांची ओरड वाढली. मेहरूण भागाला औद्योगिक वसाहतीचाही काही भाग जोडला आहे. अनेक गृहोद्योग, आस्थापना या भागात असल्याने ओरड वाढली. महावितरण कंपनीतील विविध संघटना आंदोलनात सहभागी आहेत.
नशिराबादलाही बसला फटका
मेहरूण, नशिराबाद परिसरातही वीजपुरवठा खंडित झाला होता. माहिती मिळताच क्षणी आऊटसोर्सिंगसह काही हजर असलेले कर्मचारी पाठवून तेथील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता चेतन सोनार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.