आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालग्नसमारंभाच्या निमित्ताने जिल्ह्यात आलेले वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुखांच्या अधिकृत दौऱ्यात शासकीय महाविद्यालयाच्या नवीन जागेची पाहणी आणि बैठकीचा समावेश होता. मात्र, ऐनवेळी देशमुखांनी शासकीय कार्यक्रम टाळत खासगी कार्यक्रम, भेटीगाठींकडे मोर्चा वळवला.
वैद्यकीय शिक्षणमंत्री येणार म्हणून चिंचोली येथील शासकीय महाविद्यालयाच्या जागेवर मंडप टाकून जय्यत तयारी करण्यात आली. शासकीय महाविद्यालयासह आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा येथे दिवसभर उन्हात ताटळकत बसली होती. विशेष म्हणजे मंत्री येणार म्हणून महाविद्यालयाचे बांधकामाचे कंत्राट घेतलेल्या दिल्लीतील एचएससीसी या कंपनीचे अधिकारी आणि अभियंते जळगावात दाखल झाले होते; परंतु महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावरून गेलेल्या मंत्री देशमुखांनी शासकीय कार्यक्रमाच्या मंडपात येण्याचे व जागेची पाहणी करण्याचे टाळले; परंतु बैठकीला मंत्री येणार म्हणून सायंकाळपर्यंत महाविद्यालयात प्रतीक्षा करण्यात आली; परंतु मंत्री आलेच नाहीत. दरम्यान, मंत्री देशमुख यांचे विशेष कार्य अधिकारी श्रीकांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शासकीय दौरा का टाळला यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.
शासकीय मंडपात आलेच नाहीत
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी चिंचोली येथे जागा प्रस्तावित आहे. या जागेची पाहणी मंत्री देशमुख करणार होते. प्रथम दुपारी १२.४५ वाजता ते येणार असल्याचा निरोप आला; परंतु ते चिंचोली येथे न थांबताच जामनेरला निघून गेले. तेथे मंडप टाकून दिल्लीच्या एचएससीसी कंपनीचे अधिकारी थांबून होते. त्यांनी नकाशा आणि मेडिकल कॉलेजच्या जागेची माहिती तयार ठेवली होती.
काँग्रेसकडून दौरा हायजॅक
मंत्री देशमुखांनी जामनेर येथे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडील लग्नसोहळ्यात हजेरी लावली. तेथून ते आमदार शिरीष चौधरींच्या धनाजी नाना समाजकार्य महाविद्यालय आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देण्यासाठी गेले. याच ठिकाणी राजकीय कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.