आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुप्त जळगाव दौऱ्याचे ‘रामा’यण! शिवसेनेच्या केवळ एका आमदाराला होती दौऱ्याची कल्पना

जळगाव, पाचोरा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील एक ताकदवान मंत्री कोणालाही न सांगता खासगी हेलिकाॅप्टरने एखाद्या शहरात येतील व पक्षाच्या दोघा आमदारांनाच भेटून काही वेळात हेलिकाॅप्टर पुन्हा मुंबईकडे रवाना होईल तर काय घडेल? चर्चा अन् अफवांना उधाण. मंगळवारी जळगावात उतरून पाचोरा येथे जाऊन आलेल्या मंत्री एकनाथ शिंदेंच्या गुप्त दौऱ्यानेही तेच केले आहे. राम मंदिरात पूजा करण्यासाठी ते आले होते, असे सांगितले जात असले तरी त्यांच्या या दौऱ्याचे ‘रामा’यण मात्र वेगळ्याच सुरांत गायिले जाते आहे.

पाचोऱ्याचे आ. किशोर पाटील मंगळवारी सकाळीच जळगावमध्ये दाखल झाले. कारण हेलिकाॅप्टरने मंत्री शिंदे येत आहेत हे त्यांना एकट्यालाच माहिती होते. विमानतळावर मग पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही बोलावण्यात आले. काही वेळात एका खासगी हेलिकाॅप्टरमधून त्यांचे विमानतळावर आगमन झाले. तिथे थोडा वेळ थांबून त्यांनी गप्पा मारल्या आणि आमदार किशोर पाटील यांच्या सोबत कारने ते पाचोरा येथे रवाना झाले.

मंदिर जुने; पण दर्शन नवे : पाचोऱ्यातील हे राममंदिर जुने असले तरी तिथे शिंदे कुटुंबाचा थेट संपर्क कधीच नव्हता. मंगळवारी प्रथमच एकनाथ शिंदे येथे दर्शनासाठी आले होते, असे ३५ वर्षांपासून पुजारी म्हणून काम करणारे गजानन जोशी यांनी सांगितले. त्यामुळे शिंदे यांना अशी अचानक याच रामाच्या दर्शनाची ओढ कशी लागली, असा प्रश्न चर्चांना आणि अफवांना खतपाणी घालतो आहे.
विमानतळावरून मंत्री एकनाथ शिंदे कारने पाचोऱ्याकडे रवाना होताना. सोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील आदी.

राम मंदिरात दर्शन
पाचोरा येथे प्रभू रामचंद्राचे सुमारे ३०० वर्षे जुने मंदिर आहे. तिथे मंत्री शिंदे आणि आमदार पाटील पोहोचले. काही वेळ मंत्री एकटेच मंदिरात होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर सर्वांनी रामाचे दर्शन घेतले. पाचाेऱ्याचे नगराध्यक्ष संजय गोहील, मुकुंद बिल्दीकर, उमेश गुंजाळ हेदेखील उपस्थित होते. मंदिरातून ते कारने थेट जैन हिल्सवर आले. तिथे जेवण करून ते लगेच सव्वादोन वाजेच्या सुमारास विमानतळावर गेले आणि तिथून मुंबईला रवाना झाले.

एवढी गुप्तता कशामुळे?... हा प्रश्न अनुत्तरितच
मंत्री शिंदे यांनी सोमवारी रात्री जिल्हाधिकाऱ्यांना या दौऱ्याची कल्पना दिली होती. मात्र, त्या संदर्भात कोणताही प्रोटोकाॅल किंवा बंदोबस्त नको, दौरा जाहीर करू नये असेही निर्देश होते. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनाही मंगळवारी सकाळी कल्पना देण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही शिंदे यांच्या या दौऱ्याबद्दल वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत माहिती नव्हते. ही गुप्तता का पाळण्यात आली हे कोणालाही समजले नाही.

बातम्या आणखी आहेत...