आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा दूध संघात जुलै महिन्यात प्रशासक म्हणून नियुक्ती झालेले भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना अवघ्या ३२ दिवसांत राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी न्यायालयामध्ये जाऊन खाली खेचले हाेते. त्यानंतर अवघ्या साडेतीन महिन्यांतच दूध संघातील खडसेंची एकहाती सत्ता उलथवून लावणारे आमदार चव्हाणांची त्याच संस्थेच्या चेअरमनपदी बिनविराेध वर्णी लागली. हे पद स्वीकारतानाच त्यांनी दूध संघाच्या फाॅरेन्सिक आॅडिटची घाेषणा करीत आठवड्यात संस्थेचा लेखाजाेखा थेट जनतेसमाेर समाेर मांडण्याचा निर्धार केला आहे.
जिल्हा सहकारी दूध संघात ३२ दिवस मुख्य प्रशासक म्हणून काम करणारे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांना न्यायालयात खेचून त्यांची प्रशासक नियुक्ती रद्द केली हाेती. ही घटना म्हणजे राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंचा माेठा विजय मानला जात हाेता. दरम्यान, या पदावरून पायउतार झाल्यानंतर आमदार चव्हाण हे १०९ दिवसांत म्हणजे साडेतीन महिन्यांतच दूध संघातील आमदार खडसेंची सत्ता उलथवून पुन्हा त्याच संस्थेच्या चेअरमपदी बसले आहेत. दूध संघ निवडणुकीत २० पैकी १६ जागांवर भाजप-शिंदेसेनेचे संचालक निवडून आले आहेत. दूध संघाच्या माजी चेअरमन मंदाकिनी खडसे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांनी पराभव केला आहे.
बिनविराेध निवड
दूध संघात यापूर्वी मुख्य प्रशासक म्हणून कामाचा अनुभव असलेले आमदार मंगेश चव्हाण यांची रविवारी संघाच्या चेअरमनपदी बिनविराेध निवड झाली. चेअरमनपदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी संताेष बिडवई यांनी सकाळी ९.३० वाजताच आमदार चव्हाणांच्या बिनविराेध निवडीची घाेषणा केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार सुरेश भाेळे, संजय पवार, माजी आमदार दिलीप वाघ, राेहित निकम, प्रमाेद पाटील, अरविंद देशमुख, पराग माेरे, पूनम पाटील, श्यामल झांबरे, छाया देवकर, दगडू चाैधरी, मधुकर राणे उपस्थित हाेते.
फाॅरेन्सिक आॅडिट करणार
दूध संघाची आर्थिक स्थिती, उत्पादन, विक्री याबाबत सर्व माहिती घेणार आहाेत. काही बाबींसंदर्भात फाॅरेन्सिक आॅडिट करावे लागणार आहे. येत्या काळात राज्यातील प्रमुख तीन दूध संघांमध्ये जळगावचा दूध संघ असेल.-आमदार मंगेेेश चव्हाण, चेअरमन, जिल्हा दूध संघ
शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य
दूध संघाच्या प्रगतीसाठी शासनाकडून सर्वताेपरी सहकार्य केले जाईल. दाेन्ही मंत्री म्हणून आम्ही दूध संघासाठी आवश्यक ती शासकीय मदत करू. राज्यातील प्रमुुख दूध संघात जळगावचा संघ पहिल्या क्रमांकावर नेण्याचे काम करू.-गुलाबराव पाटील, पालकमंत्री, जळगाव
चुकीच्या बाबींना थारा नाहीच
दूध संघातील ज्या बाबी चुकीच्या घडल्या आहेत त्याची चाैकशी हाेईलच. त्यातून काेणालाही माफ केले जाणार नाही.संघाच्या प्रगतीसाठी शासनाकडून आवश्यक ते सहकार्य केले जाईल. - गिरीश महाजन, ग्रामविकास मंत्री
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.