आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या तिरंगा झेंड्याविषयी प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात सन्मान आहे. त्या झेंड्याचा आदर राखण्याबाबत शिकवण्याची किंवा समजून सांगण्याची कुणालाच आवश्यकता नाही. यापूर्वीही घरावर झेंडे लावतच होतो. मात्र या इव्हेंटचे राजकारण केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगताहेत म्हणून घरावर झेंडा लावणार नाही. पक्षाच्या कार्यालयातही स्वातंत्र्यदिनी झेंडा वंदन होतेच, असे मत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व एमआयएमच्या महानगर अध्यक्षांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत हर घर झेंडा हा उपक्रम राबविण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले आहेत. त्यासाठी प्रशासन तयारी करत आहे. ज्या घरावर झेंडे लावले जाणार नाहीत. त्याठिकाणी स्वतः जात झेंडे लावण्याचे नियोजन भाजपतर्फे करण्यात येत आहे. याबाबत विरोधी पक्षांनी आपली भूमिका व्यक्त केली आहे.
भाजपला चमकोगिरीची सवय
तिरंगा झेंड्याबद्दल माझ्यासह प्रत्येक नागरिकांच्या मनात अभिमान आहे. देशाभिमान शिकवण्याची आवश्यकता नाही. लोकभावना स्वत:कडे वळविण्याच्या उद्देशाने इव्हेंट साजरे करण्याची भाजपला सवयच लागलेली आहे. चमकोगिरीचे राजकारण केले जात आहे. ते सांगतील म्हणून घरावर झेंडा लावणार नाही. स्वातंत्र्यदिनाला पक्ष कार्यालयात ध्वजारोहण होते. तेथे झेंड्याला नमन करणार आहोत. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महानगर अध्यक्ष श्याम तायडे यांनी दिली.
दरवर्षी घरावर तिरंगा लावतो
शिवसेनेचे महानगर अध्यक्ष शरद तायडे म्हणाले, देशाभिमानातून दर वर्षी स्वातंत्र्यदिनी घरावर तिरंगा लावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले म्हणून घरावर तिरंगा लावतोय असे नाही. मात्र, देशभिमानातून दरवर्षी प्रमाणे याही स्वातंत्र्यदिनाला घरावर तिरंगा झेंडा फडकवणार आहे.
पक्षाच्या भूमिकेवर निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेस शहर महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी म्हणाले, देशात अमृत महोत्सव साजरा होत आहे. तिरंगा झेंड्याविषयी अभिमानच आहे. पक्ष कार्यालयात ध्वजारोहण होते. तेथे उपस्थित राहून तिरंग्याला वंदन करणार आहेच. हर घर झेंडाबाबत पंतप्रधान मोंदींनी आवाहन केलेले आहे. त्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांच्या भूमिकेनुसार निर्णय घेतला जाईल.
कुणाच्या सांगण्यावरुन झेंडा लावणार नाही
एमआयएमचे महानगर अध्यक्ष सय्यद दानिश यांनीही आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. जे तिरंगाला आपला झेंडाच मानत नाहीत. त्यांच्या कार्यालयात वेगळाच झेंडा फडकविला जातो. त्यांना झेंडा फडकवण्याचे आवाहन करण्याची आवश्यकता नाही. इतर सर्व नागरिक झेंड्याचा सन्मान करतात. त्यांना झेंडा लावण्यास सांगण्याची आवश्यकता नाही. स्वातंत्र्यदिनी आम्ही झेंडा लावून नमन करतो. पूर्वीपासून झेंडा लावत आहोत. कुणाच्या सांगण्यावरुन झेंडा लावणार नाही तर देशभक्तीच्या भावनेने झेंडा लावणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.