आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादामुळे गैरसोय:महावितरणने तोडलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून; शहर होतंय विद्रूप

जळगाव18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरणतर्फे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी वीजपुरवठ्यास अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे; मात्र शहरात अनेक ठिकाणी महावितरणने तोडलेल्या वृक्षांच्या फांद्या रस्त्यावर तशाच पडून असल्याने त्याचा नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. तोडलेल्या फांद्या महापालिकेने उचलायच्या की महावितरणने हा अनेक वर्षांपासूनचा वाद आहे. या वादामुळे शहर विद्रूप होत आहे.

महावितरणतर्फे मान्सूनपूर्व कामांमध्ये वीज वितरणला अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडायचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या विविध भागातील ७० टक्के भागातील झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत. मात्र, ह्या झाडांच्या फांद्या अनेक भागात विखुरलेल्या पद्धतीने तशाच पडून आहेत. ह्या झाडांच्या फांद्या कोणी उचलायचा याबाबत महावितरण व महापालिका यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक भागातील रस्त्यांवर झाडांच्या फांद्या, पालापाचोळा पडलेला आहे. त्यातच पाणी पडून गेल्याने काही भागात यातून दुर्गंधीही सुटत असल्याने नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या फांद्यांची त्वरित विल्हेवाट लावण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

महापालिका प्रशासनाने महावितरणला दिले तीन पत्र
^महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारांमध्ये अडकणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडल्या आहेत; मात्र त्या तशाच रस्त्यावर पडून आहेत. महावितरणने तोडलेल्या फांद्या उचलून घेण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. या संदर्भात आरोग्य व विद्युत विभागाकडून पत्रदेखील दिले आहे; परंतु त्यानंतरही महावितरणने दुर्लक्ष केले आहे.
- श्याम गोसावी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

तोडलेल्या फांद्या उचलण्याची जबाबदारी पालिकेचीच
महावितरण कंपनीतर्फे शहरात वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटण्याची मोहीम व मान्सूनपूर्व अंतर्गत विविध कामे वेगात सुरू आहे. फांद्या तोडल्यानंतर आमची माणसे ती रस्त्याच्या कडेला उचलून ठेवतात; मात्र या फांद्या उचलण्याची जबाबदारी महावितरण कंपनीची नसून ती महापालिका प्रशासनाची आहे.
- व्ही. डी. पाटील, एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, महावितरण कंपनी.

येथे विखुरल्या आहेत फांद्या
जिल्हाधिकारी कार्यालय, काव्यरत्नावली चौक, स्वातंत्र्य चौक, पिंप्राळा परिसर, भास्कर मार्केट, गणपतीनगर, मेहरूण परिसर, लक्ष्मीनगर, भूषण कॉलनी, बसस्थानक परिसर, महाबळ परिसर आदी भागात ह्या विखुरलेल्या फांद्या व पालापाचोळा रस्त्यावर पडलेला दिसून येत आहे.

अतिरिक्त आयुक्तांच्या घरासमोरही कचरा
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोसावी यांच्या घरासमोर महावितरणने तोडलेल्या फांद्यांचा ढीग पडून आहे. तीन दिवस झाले तरीदेखील तो ढीग उचलण्यात आलेल्या नाहीत.

बातम्या आणखी आहेत...