आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओरड वाढली:महावितरण वीजजोडणी देत नाही; चोरी रोखण्यातही ठरतेय अपयशी

जळगाव8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग क्रमांक १२ मध्ये महापालिकेशी संबंधित समस्या मोजक्याच असून, या परिसरात विजेची समस्या सर्वात मोठी आहे. अनुराग स्टेट बँक कॉलनीला लागून असलेल्या समतानगरात महावितरण नागरिकांना अधिकृतपणे विजेचे कनेक्शन देत नाही. तसेच या समस्येमुळे तेथे होणारी वीजचोरीही रोखत नाही. परिणामी परिसरातील नियमित वीजबिल भरणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. या समस्येने ग्रासलेल्या नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. दरम्यान, ही समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक नितीन बरडे यांनी पुढाकार घेण्याचे आश्वासन दिले आहे.

‘दिव्य मराठी’तर्फे प्रभाग क्रमांक १२ मधील समस्यांबाबत रोटरी भवन येथे आयोजित ‘रुबरू’ या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी विजेची समस्या मांडली. व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, महावितरणचे अभियंता हेमंत खांडेकर, महापालिका, पोलिस यंत्रणेसह महावितरणचे अभियंते उपस्थित होते. नागरिकांनी विजेची समस्या मांडल्यानंतर महावितरणच्या अभियंत्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे नागरिकांचे समाधान झाले नाही. अभियंता खाे​टे बोलत असल्याचा आरोप करीत नागरिकांनी एकत्रितपणे महावितरणवर आरोपांच्या फैरी झाडल्या.

टेट बँक कॉलनीत राहणारे आर. डी. राणे यांनी समता नगरातील विजेच्या आकड्यांमुळे विजेचा दाब कमी अधिक होतो. नळाला पाणी येण्याच्या वेळेस वीज गायब होत असते. ही समस्या क्रॉम्पटन कंपनी असताना नव्हती; परंतु महावितरण आल्यापासून समस्या वाढली आहे. अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याची इच्छाच नसल्याचा आरोप करण्यात आला. या आरोपाला उत्तर देताना महावितरणचे अभियंता हेमंत खांडेकर यांनी समतानगरात आधीची थकबाकी असल्याने नव्याने कनेक्शन देताना अडचणी येतात.

महावितरणकडून नवीन ट्रान्स्फॉर्मर देताना ग्राहक संख्या विचारात घेतली जाते. कनेक्शनसाठी ४०० जणांनी अर्ज केले हाेते. त्यापैकी १५० जणांना डिमांड नाेट मिळाली. परंतु, ते पैसे भरण्यासाठी पुढे आले नाहीत. थकबाकी असलेले लोकही भरत नाहीत. त्याच ठिकाणी थकबाकी दिसत असल्याने कनेक्शन देता येत नसल्याची अडचण अभियंता खांडेकर यांनी सांगितली. दरम्यान त्यांच्या या उत्तराने समाधान न झाल्याने नागरिकांनी एकत्रितपणे अभियंत्यावर संताप व्यक्त केला. कुठल्याही परिस्थितीत हा प्रश्न सोडवावा असा सूर उमटला.

नगरसेवक बरडेंची मध्यस्थी : ही समस्या अनेक वर्षांपासूनची आहे. समस्या सोडवण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला पाहिजे. महावितरणने कनेक्शन दिलेल्या ग्राहकांना क्रॉम्प्टनने बिलेच दिली नाहीत. त्यानंतर पुन्हा महावितरण आल्याने त्यांनी थकबाकी काढत कनेक्शन कापले. लाखाे रुपयांची थकबाकी नागरिक भरू शकणार नाहीत. त्यामुळे महावितरणने यासाठी पुढाकार घेऊन कनेक्शन द्यावे. लोकांना कनेक्शन घेण्यासाठी मी एकत्रित करणार असल्याचे नगरसेवक नितीन बरडे यांनी सांगितले.

पैसे भरूनही कनेक्शन नाही
समतानगरातील रहिवासी असलेले विजय सोनार यांनी पैसे भरूनही महावितरण वीज कनेक्शन देत नसल्याचे सांगितले. दरम्यान, ही समस्या माझ्या पातळीवर सोडवली जाणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा लागणार आहे. सर्वांचे सहकार्य मिळाले तर ही समस्या सुटेल, असे महावितरणचे अभियंता खांडेकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...