आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ शहरालगत शेतात आढळुन आलेल्या मृतदेहाचे मारेकरी शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. जळगावातील दोन घटनांप्रमाणेच या घटनेत तिघे मित्र दारु प्यायल्यानंतर दोघांनी एकाच खून केला. या दोघांना 24 तासाच्या आत पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, खून का केला याची वेगवेगळी कारणे अटकेत असलेले दोघे सांगत आहेत. ही माहिती पोलिस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रोहित दिलीप कोपरेकर (वय 21, रा. भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. सागर दगडू पाटील व राहुल नेहते यांनी खून केला आहे.
घटना अशी की, रोहित कोपरकर हा तरुण 30 मे रोजी हॉटेलमध्ये कामाला जायचे असल्याचे सांगून दुचाकीने (एमएच 19 डीपी 2423) घराबाहेर पडला. तीन दिवस उलटूनही घरी न परतल्याने तो हरवल्याबाबत दोन जून रोजी बाजारपेठ पोलिसांत नोंद करण्यात आली होती. पाच रोजी वांजोळा शिवारातील मिरगव्हाण रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहामागे एक मृतदेह आढळुन आला. पाच दिवस उलटल्याने मृतदेह कुजलेला होता. चप्पल, व पँट या दोन गोष्टींवरुन पोलिसांनी ओळख पटवली.
डोक्यात दगड टाकून खून -
घटनास्थळीच शवविच्छेदन करण्यात आले. मृताच्या डोक्यात दगड टाकण्यात आल्याची बाब उघड झाली होती. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकाने शोध सुरू केला. रोहितच्या संपर्कात असलेल्या मित्रांसह त्याच्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांकडून काही संशयितांची नावे निष्पन्न केली होती.
दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली
घटनेच्या दिवशीची हॉटेलमधील व्हिडीओ पाहिले असता रोहित दोन मित्रांसोबत बाहेर जाताना दिसून आला होता. जुना सातारा भागातील स्वच्छतागृहाजवळ पांढर्या रंगाची बेवारस दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना आढळली. पोलिसांनी इंजिन व चेसीस क्रमांकावरून तपास केल्यानंतर ती दुचाकी रोहितची असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सागर दगडू पाटील याला डोंबीवली तर राहुल नेहते याला बुधवारी भुसावळातून ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. परंतु, गुन्ह्याचे कारण अस्पष्ट आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.