आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील रायपूर गावातून 17 एप्रिल पासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचे बुधवारी समोर आले. गावातच राहणाऱ्या 2 ठेकेदारांनी त्याचे अपहरण करुन खून केल्याची कबुली एमआयडीसी पोलिसांना दिली.
भुषण जयराम तळेले (वय 34) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो एमआयडीसीतील एका चटईच्या कंपनीत काम करीत होता. तर गावातच राहणाऱ्या भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी या दोघांनी त्याचा खून केल्याची कबुली दिली आहे. बुधवारी रात्रीच पोलिस मध्यप्रदेशातील बुरहाणपुर येथे भुषणचा मृतदेह शोधण्यासाठी रवाना झाले.
घटना अशी की
भुषण तळेले हे 17 एप्रिल रोजी भुसावळ येथे काम पाहुन येतो असे पत्नी यांना सांगुन गेले होते. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यामुळे पत्नीने त्यांचा शोध घेतला. त्यांचा फोनही बंद होता. दोन दिवसांनी रात्री 11 वाजता त्यांची दुचाकी रायपूर शिवारात मिळुन आली. दुचाकीच्या डिक्कीत भुषणचा मोबाईल देखील होता. बरेच दिवस शोध घेतल्यानंतर आशा यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पती हरवल्याची नोंद केली. दहा दिवसांनी आशा भातखेडा (ता. नेपानगर, बुरहाणपुर) येथे सासरी निघुन गेल्या. यानंतर एक दिवशी भिकन परदेशी याने आशा यांना फोन करुन सांगीतले की, तुझ्या पतीला मी शोधुन देईल. तो पर्यंत तू माझ्या घरी रहा. तु घरी नाही राहिलीस तर मी आत्महत्या करुन घेईल. तुमचे नाव चिठ्ठीत लिहुन जाईल. त्याच्या धमक्यांना बळी पडून आशा या कुटुंबीयांसह रायपुर येथे भिकनच्या घरी राहायला आल्या.
यानंतर भिकन व विठ्ठल यांनी वेगवेगळ्या व्यक्तींकरवी आशा यांना फोन करुन पती भुषण आम्हाला भेटल्याचे फाेन करवून घेतले. भुषण पुण्यात भेटला त्याने तुम्हाला फोन करायला सांगितला होता, असा निरोप एका अनोळखी व्यक्तीने आशा यांना फोनवर दिला होता. बरेच दिवस झाले तरी पती परत न आल्यामुळे आशा यांनी पोलिसांना गळ घातली.
त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी भिकन व विठ्ठल या दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी भुषणचा मध्यप्रदेशात खून केल्याची कबुली दिली. याच आधारावर पोलिसांनी बुधवारीच दोघांना अटक करुन न्यायालयात हजर केले. दोघांना 9 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दोघांनी खूनाची कबुली दिलेली असली तरी बुधवारी पोलिस भुषणचा मृतदेह शोधण्यासाठी गेले होते. मृतदेह सापडल्यानंतर अपहरणाच्या गुन्ह्यात खूनाचे कलम वाढवण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.