आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमावस्येच्या दिवशी शिवाजीनगरातील दाळफळ येथील घराजवळ काळ्या बाहुलीवर महिलेचे नाव लिहून हळदी कुंकू वाहण्यात आले. सूया टोचलेली ती बाहुली घराजवळ टाकून घाबरवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मंगळवारी रात्री शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुध्द जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमके प्रकरण काय?
अंजली केदार भुसारी (रा. दाळफळ, शिवाजीनगर) या महिलेने फिर्याद दिली आहे. मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास वीज प्रवाह खंडीत झालेला होता. भुसारी या पतीला जेवणाचा डबा देण्यासाठी गेलेल्या होत्या. तेथून परत आल्यानंतर त्यांनी घराचा दरवाजा उघडला. तेव्हा त्यावर कणकेचा गोळा होता. त्यावर हळद, कुंकू वाहिलेली काळी बाहुली होती. बाहुलीवर पिवळ्या अक्षरात अंजली हे नाव लिहिलेले होते. ठिकठिकाणी पिवळ्या फुल्या मारून सूया टोचलेल्या होत्या. काळ्या दोऱ्यात लाल मिरच्या बांधलेल्या होत्या. दरवाजावरील लटकवलेली बाहुली त्यांच्या समोर पडली. त्या घाबरल्या. त्यांनी पतीला फोन केल्यानंतर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
जागेचा वादातून प्रकार
भुसारी यांच्या शेजारी प्रकाश रामेश्वर व्यास, त्यांची पत्नी ललिता व्यास, सुशील गोपाळ पंडित, विद्या गोपाळ पुरोहित, गौरीलाल रुपचंद पुरोहित ४० ते ४५ वर्षांपासून राहतात. ती जागा त्यांच्या सासऱ्यांनी तिघांना वापरण्यास दिली आहे. मात्र, २००७ मध्ये त्यांनी ती जागा रिकामी करण्यास सांगितले.तरीही त्यांनी जागा सोडली नाही. तेव्हापासून ते भुसारी कुटुंबीयांसोबत वैरभावनेने वागत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
कपड्यावर रक्त टाकले
भुसारी यांनी तिघांविरुध्द न्यायालयात दिवाणी स्वरुपाचा दावा दाखल केलेला आहे.त्याचा निकाल सन २०१७ मध्ये भुसारी यांच्या बाजूने लागला. त्या वैरभावनेतून ३ फेब्रुवारी दुपारी ३ वाजताही त्यांच्या घराच्या दरवाजावर मानवी केस व हळद, कुंकू टाकलेले दिसले. १४ जून रोजीही पौर्णिमेच्या रात्री वाळत घातलेल्या कपड्यावर रक्त टाकण्यात आलेले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आलेले आहे. त्यावरुन जादूटोणा प्रतिबंधक कायदा अधिनियम २०१३ च्या कलमानुसार पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.