आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नंदुरबार येथे मंजूर असलेल्या आदिवासी संशोधन व अध्ययन केंद्राच्या अर्थात ट्रायबल अकादमीच्या माध्यमातून आदिवासींची जीवनशैली, परंपरा, संस्कृती, भाषा, वस्तू यांचे संशोधन व संवर्धन होणार आहे. नंदुरबार येथील टोकरतलाव शिवारातील २५ एकर जागेत हे केंद्र साकारले जात आहे.
अकदामीचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. सन २०२३ मध्ये संपूर्ण विभागांचे काम पूर्ण होऊन अकदामी सुरु होणार आहे. राज्यासह देशभरातील संशोधक येथे येऊन अभ्यास करू शकतील. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ६५ टक्के लोक आदिवासी आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व जीवनशैली वेगळी आणि प्राचीन आहे. या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच त्यात संशोधन व्हावे या उद्देशाने विद्यापीठाने आदिवासी अकादमी अर्थात आदिवासी अध्ययन केंद्र स्थापन केले आहे.
अकादमी सहा मुद्द्यांवर काम करणार आहे. त्यात ‘सिटी लाइक व्हिलेज’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवले जाणार आहे. शहरी भागात ज्या सुविधा आहेत त्या सुविधा ग्रामीण भागात कशा देण्यात येतील याबाबत संशोधन करण्यात येत आहे. याशिवाय आदिवासी भागातील नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन व जतनावर भर दिला जाणार आहे. आदिवासी भागातील पारंपरिक उपचार पद्धती व नवीन उपचार पद्धती एकमेकांना कशा पूरक राहतील या विषयावर संशोधन केले जाणार आहे. दुर्मीळ वस्तू, उपकरणे साहित्य, संसाधने यांचा संग्रह या ठिकाणी केला जाणार आहे. आदिवासी बोलीभाषा, सण, उत्सव यांचे संवर्धन, जतन व त्यांचे संशोधन होणार आहे. याशिवाय क्रीडा प्रबोधिनी सुरू केली जाणार आहे. या सर्व विभागांचे काम सन २०२३च्या अखेरीस पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
अशी आहे अकादमीची रचना
नंदुरबार येथील टोकरतलाव रस्त्यावरील १० हेक्टर अर्थात २५ एकर जागेत ही अकदामी साकारण्यात येत आहे. तळमजला व त्यावर दोन मजले अशी ही इमारत उभारण्यात आली आहे. तळमजला व पहिल्या मजल्यावर दोन वर्कशॉपच्या खोल्या, दोन वर्गखोल्या, समुपदेशन केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि सामुदायिक हॉल उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या मजल्यावर हेड ऑफ डिपार्टमेंट कार्यालय, संगणक कक्ष, ग्रंथालय, वस्तू संग्रहालय, वर्कशॉप हॉल तयार करण्यात आला आहे.
उपक्रमांपासून होणार सुरूवात
पहिल्या टप्प्यात या ठिकाणी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने या ठिकाणी विविध केंद्र सुरु केले जाणार आहे. दोन कोटी ५० लाखांचा निधी नंदुरबार डीपीडीसीमधून मिळालेला आहे. आदिवासी अकादमीच्या सहा केंद्रांच्या इमारती बांधकाम व इतर सुविधा, आधुनिक डिजिटल उपकरणे, सौरऊर्जेवर चालणारी वाहने, सौरपंप व सौरऊर्जा संच यांच्यासाठी भरीव निधी देण्यात आला आहे. या सोबतच केंद्रात प्राशासकीय अधिकारी, तंत्रज्ञ, तांत्रिक सहाय्यक, सहाय्यक, वाहनचालक, शिपाई, सुरक्षारक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व जीवनशैली वेगळी आणि प्राचीन आहे. या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच त्यात संशोधन व्हावे या उद्देशाने विद्यापीठाने आदिवासी अकादमी र स्थापन केले आहे.
आदिवासी संशोधनाला वेग येईल
ट्रायबल अकदमी अंतर्गत १२ प्रमुख विभाग उभारले जाणार आहेत. त्यातील सिलेज प्रकल्पाचे काम गतीने सुरु आहे. इतर विभाग देखील लवकरच सुरु होऊन पुढील वर्षी अकदामी सर्वांसाठी खुली करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे आदिवासी संशोधनाला वेग मिळेल.
डी. एस. पाटील,
प्राचार्य, एकलव्य प्रशिक्षण केंद्र, नंदुरबार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.