आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वामी समर्थ केंद्रात नवरात्रीचा उत्सव:64 भाज्या, 25 फळांचा शाकंभरी मातेला केला श्रृंगार; 500 भाविकांना वाटला प्रसाद

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दुर्गा देवीच्या विविध रुपांपैकी एक महत्त्वाचं रूप म्हणजे शाकंभरी देवी. या अन्नपूर्णेला अन्नातील आहार असलेल्या 64 भाज्यांची आर्कषक आरास करीत नैवद्य दाखविण्यात आले. यासह पालेभाजा व 25 फळांचा देवीला श्रृंगार करण्यात आला. शुक्रवारी प्रतापनगरातील श्रीस्वामी समर्थ केंद्रात शेकडो सेवेकऱ्यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने नवरात्र उत्सव साजरा केला.

शांकभरी नवरात्र पौष शुद्ध सप्तमी ते पौष शुद्ध पौर्णिमेपर्यंत नवरात्र उत्सव साजरा केला जातो. या अंतर्गत पोर्णिमेला नवरात्रीची सांगता करण्यात आली. यानिमित्त मंदीरात विविध धार्मीक कार्यक्रम घेण्यात आले. यासह शाकंभरी पोर्णिमेनिमित्त शहरातील भवानीमाता मंदीर, यासह गुरुकुल कॉलनी सेवा केंद्रातही भाज्यांचा देवीला श्रृंगार करण्यात आला.

असे केले आरासाचे नियोजन

देवीला 64 भाज्यांचा नैवद्य दाखविण्यासाठी प्रत्येक सेवेकऱ्याने स्वखर्चाने एक प्रकारातील सव्वा किलो शिजवलेल्या व तयार करून आणलेल्या कोरड्या प्रकारातील भाज्या आणल्या होत्या. सर्व भाज्या स्वतंत्र ताटामध्ये रंगानुसार आर्कषक पद्धतीने रचना करण्यात आली. यात सुमारे 90 किलोवर भाज्या जमा झाल्या. सर्व भाज्यांची आरती करून त्याचे नैवेद्य दाखविण्यात आले. यावेळी पाचशेपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले. महिला, युवकांनी यात विशेष सहभाग घेतला.

भाज्यांचा दिला जाणार प्रसाद

मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या भाज्या व श्रृंगारातील फळे हे पूजा आरती नैवद्यानंतर संकलित करून त्या भाविकांमध्ये प्रसाद म्हणून वाटप करण्यात आल्या. हा प्रसाद कुठेही फेकला जाणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली. मंदीराचे विश्वस्त बी.एम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेवेकरी अतुल कासार, भावेश देवरे, गोकुळ सोनार, कैलास वाणी आदींनी नियोजन केले.

या कथेमुळे होतो उत्सव साजरा

एकदा पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस न झाल्यानं दुष्काळ पडला होता. पृथ्वीवर खाण्यासाठी अन्नाचा एकही दाना उपलब्ध नव्हता. त्यांच्यावरील संकट बधून देवीनं अयोनिजाचं रूप घेतलं. संकटात असलेल्या आपल्या सर्व मुलांचे कष्ट दूर करण्यासाठी देवी शाकंभरी रूपात प्रकटली. देवीचं हे विराट रूप होतं. या रुपामध्ये देवीच्या संपूर्ण शरीरावर विविध प्रकारचे झाडं आणि भाज्या होत्या. जोपर्यंत पाऊस पडला नाही, तोपर्यंत संपूर्ण पृथ्वीवर शाकंभरी देवीनं आपल्या शरीरावरील भाज्या, झाडांमुळे सर्वांचे प्राण वाचवले अशी अख्यायिका आहे, त्यामुळे हा नवरात्रोत्सव साजरा केला जातो असेही सेवेकऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...