आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा निवडणुकीत भाजपचे तीन उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजप नेते गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक अरविंद देशमुख यांनी व्यक्त करीत एक लाखाची पैज लावण्याचे आव्हान दिले होते. जळगावचेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राहुल पाटील यांनी ते आव्हान स्वीकारलेही आणि लगेचच हरलेही. त्यानंतर एक लाख रुपये घेऊन ते देशमूख यांना देण्यासाठी गेले खरे; पण पाटील यांनी दिलेले पैसे मोठ्या मनाने नाकारले. हल्लीच्या स्वार्थी राजकारणाला दिलेली चपराकच असल्याचे मानले जात आहे.
देशमुखांनी केली पोस्ट
राज्यसभा निवडणुकीत भाजपचे तिघे उमेदवार निवडून येतील. त्यावर पैज लावण्यास मी तयार आहे. कृपया कोणी पैज लावणार असेल, तर मला संपर्क करा, असे आव्हान देशमुख यांनी एक फेसबुक पोस्ट करून दिले होते. त्यानंतर राहुल पाटील यांनी हे आव्हान स्वीकारले.
धनादेश नाकारला
राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जळगावातील पदाधिकारी राहुल पाटील यांनी अरविंद देशमुख यांचे आव्हान स्वीकारले. मात्र, राहुल पाटील पैज हरले. त्यामुळे ते एक लाख रुपयांचा धनादेश घेऊन शनिवारी दुपारी अरविंद देशमुख यांना देण्यासाठी गिरीश महाजनांच्या जी. एम. फाउंडेशन कार्यालयात गेले. पण देशमुख यांनी एका कार्यकर्त्याचा सन्मान म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश राहुल पाटलांना परत केला. अरविंद देशमुख आणि राहुल पाटील यांच्यातल्या पैजेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
यामुळे लावली पैज?
गिरीश महाजन यांनी यापूर्वी झालेल्या अनेक निवडणुकांमध्ये राजकीय गणितांची जुळवाजुळव यशस्वी केली. त्यांचा या क्षेत्रातील मोठा अनुभव आहे. राज्यसभा निवडणुकीत त्यांच्यावर मोठी जबाबदारी होती. त्यामुळे भाजपला निश्चित यश मिळेल, हा विश्वास देशमुख यांना होताच त्यामुळेच त्यांनी पैज लावण्याची पोस्ट केली होती.
पैशांसाठी नव्हती पैज
मुळात ही पैज अरविंद देशमुख यांनी पैशांसाठी लावली नव्हती. म्हणून पैज जिंकल्यानंतर त्यांनी राहुल पाटील यांनी आणलेला एक लाखांचा धनादेश त्यांना परत केला. एक सच्चा कार्यकर्ता म्हणून राहुल यांचा मला अभिमान वाटला अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
राहुल पाटीलही भावुक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवारांवर आपला दृढ विश्वास आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत त्यांचे डावपेच यशस्वी होतील, हा विश्वास होता. तो सार्थ ठरला, पण दुर्दैवाने संजय पवारांचा पराभव झाला. पैज हरल्याने आपण देशमुखांना पैसे देण्यासाठी गेलो पण त्यांनी मोठ्या मनाने धनादेश परत केला, अशा भावना राहुल पाटील यांनी व्यक्त केल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.