आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंडखोरांवर एकनाथ खडसेंचे टीकास्त्र:म्हणाले- यांच्या बापजाद्याने कधी 50 खोके पाहिले नसतील, जनतेला वाऱ्यावर सोडू नका

जळगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिंदे गटाने भाजपसोबत जाऊन राज्यात सत्ता स्थापन केले तेव्हापासून या बंडखोरांवर विविध प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. शिवसेनेतून बंडखोरीसाठी या आमदारांना 50 कोटी रुपये देण्यात आल्याचा दावा महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी यावरुन बंडखोरांवर टीका करत म्हटले आहे की, 'यांच्या बापजाद्याने कधी 50 खोके पाहिले नसतील'

रविवारी मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात एकनाथ खडसेंची प्रमुख उपस्थिती होती. त्या मेळाव्यात बोलताना खडसे म्हणाले की, "यांच्या बापजाद्याने कधी 50 खोके पाहिले नसतील. तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका,' असे सांगत एकनाथ खडसेंनी शिंदे सरकारकडून लोकशाहीची टिंगल केली जात असल्याचे म्हटले आहे.

सरकार पोरखेळपणा सुरू

राज्यात सत्तास्थापन होऊन सुमारे महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटला असून यावर बोलताना खडसे म्हणाले की, 'एक मुख्यमंत्री तर दुसरा बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या 37 दिवसांपासून सरकारचा पोरखेळपणा सुरू आहे,' अशा शब्दांत त्यांनी सरकारला फटकारले आहे.

नाथाभाऊ पुरून उरणार

पुढे केंद्रीय तपास यंत्रणांवर बोलताना खडसे म्हणाले की, ईडी नावाचा प्रकार आता घरोघरी पोहोचला असून, नाथाभाऊच्या मागे ईडी लागली, सीबीआय, एटीएस अशा अनेक यंत्रणा पाठीमागे लागल्यात. कारण त्यांना माहिती आहे की, हा एकच माणूस सर्वांना पुरून उरू शकतो.

राज्यातील विकासकामे रखडली

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. या मेळाव्यात एकनाथ खडसे बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रात अद्याप मंत्रिमंडळ तयार झालं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाच कारभार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांकडं फायलींचा ढिग असतो. उपमुख्यमंत्री तर बिनखात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील विकासकामे रखडली असल्याचा आरोप खडसे यांनी केला.

राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल

राज्यात शिंदे सरकारकडे अडीच वर्षांचा वेळ बाकी आहे. परंतु, अजून इतर मंत्र्यांनी शपथ घेतली नाही. एक महिना ओलांडला, तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. हे सरकार अडीच वर्षे चालेल, असे वाटत नसल्याचं खडसे म्हणाले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. या राज्यात निर्णय घेणार फक्त एकच व्यक्ती आहे. त्यामुळे एकूण किती दिवस हे सरकार टिकेल, काही सांगता येत नाही. या सरकारचा काही भरोसा नाही, असंही खडसे म्हणाले. एकंदरित कार्यकर्त्यांना तयारीला लागा, असाच काहीसा संदेश एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना दिला.

बातम्या आणखी आहेत...