आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपत्ती व्यवस्थापन:एनडीआरएफ पथक आजपासून 968 विद्यार्थ्यांना जळगावात देणार प्रशिक्षण

जळगावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सोमवारपासून राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराला प्रारंभ होत आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाइन) उद‌्घाटन करतील. दहा दिवस हे प्रशिक्षण शिबीर चालणार आहे. प्रशिक्षण शिबिरात राज्याच्या २३ विद्यापीठामधील ९६८ रासेयो स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.

त्यात ५६३ विद्यार्थी, ४०५ विद्यार्थिनी व ३९ पुरूष संघ व्यवस्थापक, २६ महिला व्यवस्थापक आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या पदवीप्रदान सभागृहात उदघाटन समारंभ होईल. राज्यपाल कोश्यारी हे अध्यक्षस्थानी राहतील. ते ऑनलाइन प्रणालीव्दारे विद्यार्थ्याना मार्गदर्शन करतील. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांची प्रमुख उपस्थिती असेल. एनडीआरएफचे असिस्टंट कमांडर नीखिल मुधोळकर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहतील.

२८ डिसेंबरपर्यंत हे प्रशिक्षण सूरू राहणार आहे. नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीच्यावेळी कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी याचे प्रशिक्षण राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) तज्ज्ञ देणार आहेत. ‘आव्हान २०२२’चा बलून विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर उभारण्यात आला आहे. ठिकठिकाणी ध्वज लावण्यात आले आहेत. पदवीप्रदान सभागृहात उदघाटन समारंभासाठी १५०० जणांची आसन व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासून विविध विद्यापीठांचे संघ दाखल होऊ लागले आहेत.

शिबिरासाठी २२ समित्यांची नियुक्ती
उद‌्घाटनानंतर दुपारी ३ ते ३:४० या वेळेते एनडीआरएफ विषयी माहिती दिली जाईल. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाची मुळ कल्पना आणि वैद्यकीय प्रथमोपचार या विषयी माहिती सांगितली जाईल. शिबिराच्या यशस्वीतेसाठी २२ समित्यांमधील २१० सदस्य परिश्रम घेत आहेत अशी माहिती राष्ट्रीय सेवा याेजना विभागाचे संचालक डॉ. सचिन नांद्रे व समन्वयक प्रा. किशोर पवार यांनी दिली.

नऊ बसेसची केली आहे व्यवस्था
मुलांच्या वसतिगृहात पुरूष रासेयो स्वयंसेवकांची व पुरूष संघ व्यवस्थापकांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुलींच्या तीन वसतिगृहात सहभागी विद्यार्थिनींची व्यवस्था केली आहे. गरम पाण्याची व्यवस्था आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नऊ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी हे स्वत: व्यवस्थेची पाहणी करत आहेत अशी माहिती देण्यात आली.

विद्यापीठात नाेंदणी कक्ष
विद्यापीठाच्या एपीजे अब्दुल कलाम भवनाजवळ नोंदणी कक्ष उभारण्यात आला आहे. त्या ठिकाणी तीन काउंटर उभारण्यात आले आहेत. यापूर्वीच संघाची ऑनलाइन नोंदणी करण्यात आलेली आहे. काऊंटरवर कार्यक्रम अधिकाऱ्यांकडून नोंदणी अर्ज व घोषणापत्र जमा करणे, किट घेणे या प्रकारची कामे केली जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...